मुंबई : Mamata Banerjee's Mumbai Visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये सुमारे अर्धा तास हा संवाद झाला. यानंतर ममता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचीही भेट घेणार आहे. त्यांच्या या राजकीय दौऱ्याबाबत नव्या विरोधी आघाडीची तयारी त्या करत आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्याकडे टीएमसीचा विस्तार म्हणून पाहिले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीतून महाराष्ट्रात भाजपविरोधात नव्या युतीबाबत हवा तेज होत आहे. आजकाल तृणमूल काँग्रेसने काँग्रेसपासून चार हात अंतर दूर ठेवले असले तरी महाराष्ट्रात राष्ट्रवादी-शिवसेनेशिवाय काँग्रेसही सत्ताधारी आघाडीचा एक भाग आहे.
ममता यांचा दौरा आणि त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत घेतलेल्या भेटीबद्दल, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणतात की, काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय विरोधी पक्षांची कोणतीही आघाडी स्थापन होऊ शकत नाही. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय विरोधकांची कोणतीही आघाडी स्थापन होऊ शकत नाही, असे शदर पवार यांचेही स्पष्ट मत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज बुधवारी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेणार आहेत. ममता यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घ्यायची होती, पण नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना विश्रांतीची गरज आहे. तसेच ठाकरे यांना डॉक्टरांनी क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.
यावर्षी मे महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) विजयानंतर, ममता एका नवीन उंचीवर आहेत आणि राष्ट्रीय राजकारणात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांनी एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी यांच्या प्रचाराची योजना आखली होती, मात्र काही अडचणींमुळे ते करू शकले नाहीत. शिवसेनेने तृणमूलला धक्का लागू नये म्हणून तिथे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सामना करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शरद पवार आणि ममता बॅनर्जी दोघेही राष्ट्रीय विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. पवारांव्यतिरिक्त ममतांचे उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहेत. काँग्रेससोबतचे त्यांचे संबंध ताणले गेले असले तरी त्यांनी यापूर्वी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे.