इम्पिरेकल डेटा मागितल्यावरून मिर्च्या का झोंबल्या, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

शरमेनं मान खाली जाईल असं कालचं दृश्य होतं, महाराष्ट्रासाठी काल घडलं ते लाजिरवाणी होते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

Updated: Jul 6, 2021, 06:10 PM IST
इम्पिरेकल डेटा मागितल्यावरून मिर्च्या का झोंबल्या, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल title=

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी घातलेल्या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रासाठी काल घडलं ते लाजिरवाणी होते, आपल्या संस्कृतीला साजेसं नाही, शरमेनं मान खाली जाईल असं कालचं दृश्य होतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. 

बाळासाहेब थोरात हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे. त्यांच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला. माझ्या पहिल्याच कारकिर्दीत मला हा प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे मी अवाक् झालो. एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं. ज्या पक्षाने केले त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं, ही आरोग्यदायी लोकशाहीची लक्षणे नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

भास्कर जाधव यांच्यासोबत दालनात घडलं ते संपूर्ण वर्णन त्यांनी केलेले नाही, ते शिशारी आणणारं होतं महाराष्ट्रात असं घडू शकतं यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

केंद्राकडे इम्पिरेकल डेटा मागितला, राज्यपालांना सुद्धा आम्ही ही विनंती केली होती ही माहिती केंद्राकडे आहे ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा. तोच ठराव आम्ही विधिमंडळात केला तर यात चुकीचं काय आणि एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? ओबीसी समाजाच्या बाबतीत जर आपल्या मनात द्वेश असेल तर तो वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रकट करु शकत होता, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, सध्या कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक घेणे शक्य झाले नाही. परंतु कोरोना परिस्थिती आटोक्यात येईल तेव्हा निवडणूक घेऊ. या संदर्भात मी राज्यपालांना देखील कळवलं आहे.

बोगस लसीकरण ज्यांनी केलं त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार. तसेच ज्यांना बोगस लस दिली त्यांचं रितसर लसीकरण केलं जाईल. असे उद्धव ठाकरे म्हणाले.