मुंबई - दोन दिवस चाललेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनातील दोन दिवसांच्या कामकाजाची माहिती दिली.
आतापर्यंत या सभागृहाचं पावित्र्य राखले गेलं, पण काल घडलेली गोष्ट अशोभनीय होती, विरोधी पक्षाचा तोल गेला, त्यांचं त्यांच्यावर नियंत्रण राहिले नाही, लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा अपमान विरोधी पक्षांकडून करण्यात आला, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.
सभागृहातील गोंधळानंतर अध्यक्षांच्या दालनात बरंच काही घडलं, भास्कर जाधव यांनी जे घडलं ते सगळंच सांगितलं नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण अध्यक्षांच्या दालनात जे झालं त्याचा व्हिडिओ बघितला तर आपली मान शरमेने खाली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलंय. कालचा प्रकार कमी होता म्हणून त्यांनी आज प्रति विधानसभा भरवली, हे अशोभनीय असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.
राज्यातील विविध विभागातील 15,511 रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. ज्या ज्या विभागानी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. त्यानुसार 2018 पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत.