मुंबई : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मनसुख हिरेन, पूजा चव्हाण आणि मोहन डेलकर यांच्या वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या मृत्यूमुळे गाजत आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहयला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन करावे आणि तत्काळ अटक करावी अशी मागणी केली. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूबाबत एसआयटी नेमल्याची घोषणा केली.
अनिल देशमुख यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधीमंडळात निवेदन दिले . ते म्हणाले की, 'मोहन डेलकर हे दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे 7 वेळा खासदार होते. त्यांनी मुंबईत येऊन का आत्महत्या केली हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचे नाव आहे. त्यांनी त्यांचा मानसिक छळ करत, सामाजिक जीवनातून हद्दपार करण्याच प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. शिवाय मोहन यांची पत्नी आणि मुलानेही हीच तक्रार माझ्याकडे केली आहे. पटेल हे पुर्वाश्रमीचे भाजपचे गुजरातचे गृहमंत्री होते. आपल्याला महाराष्ट्रात न्याय मिळेल म्हणून त्यांनी महाराष्ट्रात येऊन आत्महत्या केली. त्यामुळे मोहन यांच्या आत्महत्याप्रकरणी राज्य सरकारच्यावतीने एसआयटी नेमण्यात आल्याची मी घोषणा करीत आहे'
'मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की,'मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यात आला आहे. राज्याचा एटीएस देखील याप्रकरणी चौकशी करीत आहे. विरोधकांकड़े पूरावे असल्यास त्यांनी ते एटीएसला द्यावे' असेही गृहमंत्र्यांनी यावेळी म्हटले
गृहमंत्री देशमुख यांच्या निवेदनावर फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, 'हिरेन यांच्या मृत्यू्प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या विरोधात सर्व पूरावे असताना तसेच हिरेन यांच्या पत्नीची तक्रार असताना, सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता म्हणून सरकार त्यांना वाचवत आहे का? एका खु्न्याला वाचवण्यासाठी तुम्ही असे करत असाल तर काळ तुम्हाला माफ करणार नाही. वाझे एका पक्षाचे होते म्हणून गृहमंत्री एका अपराध्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ' यापुढे बोलताना फडणवीस यांनी वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली आहे.
क़ॉंग्रेस आमदार नाना पटोल यांनी सीडीआर फडणवीसांना कुठून मिळाला याबाबत आक्षेप घेतल्याने, फडणवीस यांनी पलटवार करीत म्हटले की, 'होय मी सीडीआर मिळवला. माझी चौकशी करा, पण ज्या वाझेने खुन केलाय त्याची तर आधी चौकशी करा. असा संताप फडणवीस यांनी विधीमंडळात केला'.