मुंबई : मुंबईतल्या लोकलची गर्दी गेल्या काही वर्षांत तुफान वाढली आहे. या गर्दीतला प्रवास धोकादायक झाला आहे. त्यामुळं कल्याण डोंबिवली आणि ठाण्यातील अनेक नागरिकांनी नोकरीलाच रामराम केला आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला मुंबईतल्या कोणत्याही रेल्वे स्टेशनवर ही अशी गर्दी असते. शेळ्या मेंढ्यांसारखे लोक स्वतःला रेल्वे डब्यात कोंबत असतात. प्रवाशांची संख्या हजारोंमध्ये असते. पण तुलनेनं लोकलची संख्या अतिशय तोकडी. रोजची गर्दी, रेटारेटीला प्रवासी कंटाळले आहेत. प्रवासाला कंटाळून नोकरी सोडण्याच्या मानसिकतेत प्रवासी आले आहेत.
मुकूल मुजूमदार या अशाच एक प्रवासी आहेत ज्या नोकरीसाठी त्या ठाणे ते अंधेरी असा प्रवास करत होत्या. दररोजच्या प्रवासात त्यांना गाडीत चढायलाही जागा मिळत नव्हती. लोकलमध्ये चढलं तरी होणारी रेटारेटी आणि वादविवाद याला कंटाळून त्यांनी सप्टेंबर महिन्यात राजीनामा दिला. जोपर्यंत रेल्वेचा प्रवास सुसह्य होणार नाही तोपर्यंत प्रवास करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
रेल्वेकडूनही लोकल वेळापत्रकानुसार चालवल्या जात नाहीत. प्रवाशांनीही रांगेत उभं राहून गाडीत चढावं अशी मागणी त्या करत आहेत. प्रवाशांची संख्या ज्या प्रमाणात वाढली आहे त्या प्रमाणात लोकलची संख्या वाढलेली नाही. शिवाय फलाटांची लांबीही वाढवण्यात आलेली नाही. रेल्वेनं प्रवाशांचा प्रवास सुखकर कसा होईल याचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लाईफलाईन ओळखली जाणारी लोकलची प्रतिमा डेथलाईन अशी होऊ पाहते आहे. रेल्वेतून कोणीतरी पडणं हे आता सामान्य होत चाललं आहे. एवढंच नाही तर ही लोकलच्या गर्दीमुळे मुंबईकरांचं करिअरही धोक्यात आलं आहे. पण रेल्वे मात्र आहे तशीच सुरु आहे. रेल्वेनं याचा गांभीर्यानं विचार करायची वेळ आली आहे.