भीक देणाऱ्यांवर दाखल होणार FIR; भारतातल्या 'या' शहरात 1 जानेवारीपासून अंमलबजावणी! कारण फारच रंजक

Beggar Free City In India: भारतामधील शहरामध्ये हा कठोर नियम लागू केला जाण्यामागे काही धक्कादायक खुलासे आणि केंद्र सरकारची योजना कारणीभूत आहे

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 17, 2024, 02:34 PM IST
भीक देणाऱ्यांवर दाखल होणार FIR; भारतातल्या 'या' शहरात 1 जानेवारीपासून अंमलबजावणी! कारण फारच रंजक title=
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आदेश (फाइल फोटो - सौजन्य रॉयटर्स)

Beggar Free City In India: देशातील सर्वात स्वच्छ शहराने आता भीक मागणाऱ्यांपासून मुक्त होण्याचं ठरवलं आहे. त्या दृष्टीनेच एक फारच रंजक नियम या शहरामध्ये लागू केला जणार आहे. रस्त्यावर एकही व्यक्ती भीक मागताना दिसू नये म्हणून शहरामध्ये कठोर नियम अंमलात आणले जाणार आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आले आहे. मात्र या नियमांचं वेगळेपण म्हणजे भीक मागाणाऱ्यांवर नाही तर भीक मागणाऱ्यांना पैसे देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 1 जानेवारीपासून भारतातील या शहरामध्ये भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. भीक मागणाऱ्यांना पैसे देणाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली जाईल असं प्रशासनाने स्पष्ट केलेलं आहे.

कुठे लागू होणार हा नियम?

ज्या शहरामध्ये हा नियम लागू झाला आहे ते शहर महाराष्ट्राच्या बाजूच्या मध्य प्रदेशमधील इंदूर शहर आहे. येथील जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. शहरामध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्यासंदर्भातील आदेश प्रशासनाने यापूर्वीच जारी केले आहेत. "आम्ही भीक मागणाऱ्यांविरोधात जनगजागृती केली. ही जनजागृती डिसेंबरच्या शेवटपर्यंत सुरु राहणार आहे. 1 जानेवारीनंतर शहरात कोणी भीक देताना दिसल्यास त्या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केली जाईल," असं आशिष सिंह म्हणाले. "मी इंदूरमधील लोकांना आवाहन करतो की त्यांनी भीक देऊन या पापामध्ये सहभागी होऊ नये," असंही आशिष सिंह म्हणाले.

धक्कादायक वास्तव आलं समोर

इंदूरमधील या मोहिमेसाठी मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या दिनेश मिश्रा यांनी, "आम्ही यासंदर्भात अहवाल तयार केला असून त्यामध्ये आम्हाला काही धक्कादायक गोष्टी कळल्या. भीक मागणाऱ्या लोकांची चांगली घर आहेत. काहींची मुलं बँकांमध्ये काम करतात. एकदा एका भिकाऱ्याकडे तब्बल 29 हजार रुपये सापडले होते. एका भिकाऱ्याने पैसे उधारीवर दिले होते ज्यावर त्याला व्याज मिळत होतं. एकजण तर राजस्थानवरुन इथे मुलांबरोबर भीक मागायला आल्याचं आढळून आलं," असं सांगितलं. अनेक संस्थानी यासंदर्भातील भूमिकेमध्ये सरकारला पाठिंबा दिला असल्याची माहिती मध्य प्रदेशचे सामाजिक न्यायमंत्री नाराय सिंह कुशवाह यांनी सांगितलं. 

लवकरच इतर शहरांमध्येही राबवणार?

केंद्र सरकारकडून भीक मागाणाऱ्यांचं पुनर्वसन करण्याच्या योजनेअंतर्गत इंदूरमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवला जात आहे. केंद्राच्या या प्रकल्पामध्ये दहा शहरांचा समावेश असून यामध्ये दिल्ली, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, इंदूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, पाटणा आणि अहमदाबादचाही समावेश आहे. त्यामुळे असा प्रकल्प या उरलेल्या 9 शहरांमध्येही राबवला जाणार का हे इंदूरमधील प्रकल्पाच्या यशावर अवलंबून असल्याचीही चर्चा आहे.