राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असून, त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. मी तुमच्या हातातील काही लहान खेळणं आहे का? अशी संतप्त विचारणाही त्यांनी केली आहे. दरम्यान यावर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाष्य केलं आहे. छगन भुजबळांबद्दल आपल्याला फार वाईट वाटलं असं त्यांना नागपूरमधील पत्रकार परिषदेत म्हटलं. तसंच भुजबळ अधुनमधून आपल्या संपर्कात असतात असाही खुलासा केला.
"भुजबळांबद्दल मला फार वाईट वाटलं. अनेकांबद्दल मला आतून फार वाईट वाटत आहे. अनेकजण तिथे अपेक्षेने गेले होते. काहीजणांना घट्ट झालेलं जॅकेट घालायला मिळालं. काहीजण मात्र अद्यापही त्याची वाट पाहत असतील. त्या सर्वांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. सरकारची झाली दैना, त्यामुळे तिथे चैना नाही. त्यामुळे वहाँ नही रेहना हे त्यांचं म्हणणं योग्य आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
नाराज झालेलं कोणी संपर्कात आहे का? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, "निरोप येत आहेत. त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती. अनुभव हाच उत्तम गुरु असतो. हा उत्तम गुरु त्यांना मिळाला आहे. त्यातून त्यांना शिकू द्या, सुधारे तर बघू. मला 2019 ला अनुभव मिळाला". भुजबळांनी अद्याप संपर्क केलेला नसला तरी ते अधूनमधून माझ्या संपर्कात असतात असा खुलासाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
अजित पवार मंत्रिमंडळ विस्तारानंतर नॉट रिचेबल असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांची ही जुनी सवय आहे, आता पहाटे कुठे आहेत बघा असं ते उपहासात्मकपणे म्हणाले.
"प्रत्येकाने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करायला हवी. आता लाडकी बहीणपेक्षा लाडके आमदार आणि नावडते आमदार अशी चर्चा सुरु झाली आहे. पहिल्या पाच महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढील पैसे वाटायला लागू नये यासाठी स्थगित आणली असं मला समजत आहे. आता निवडणूक संपली आहे, आचारसंहित संपली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मंत मिळवण्यासाठी ही योजना आणून खात्यात पैसे टाकले ती योजना तात्काळ सुरु केली पाहिजे. 1500 नव्हे तर 2100 रुपये आणि मागील बॅकलॉग भरुन काढला पाहिजे. आवडती, नावडती बहीण न करता खात्यात जमा झाले पाहिजेत," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.