मुंबई: राज्यातील मराठा संघटनांकडून मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये सोमवारी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चातील काकासाहेब शिंदे या तरूणाने आंदोलनादरम्यान गोदावरीच्या पात्रात उडी मारली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांकडून हा निर्णय घेण्यात आला.
संबंधित बातमी मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू
महाराष्ट्र बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्र बंद राहील. मात्र, मोर्चेकऱ्यांनी कोणत्याही बसवर दगडफेक करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमधील घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, ही मागणीही मराठा संघटनांनी लावून धरली आहे. मुख्यमंत्र्यांनी याविषयी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान, आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी सांगितले. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन बेमुदत सुरु राहील, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र बंद आंदोलन सुरु असताना मुंबईतील मराठा मंदिर येथे दुपारी २.३० वाजता मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीची बैठक पार पडेल. यादरम्यान सरकारचे प्रतिनिधी मोर्चेकऱ्यांशी संपर्क साधून काही तोडगा काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातमी मुख्यमंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा, काकासाहेब शिंदेच्या कुटुंबीयांची मागणी
तत्पूर्वी काकासाहेब शिंदे याचा मृतदेह स्वीकारण्यास त्याच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासह त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे, आरक्षणाची तात्काळ घोषणा, शिंदेच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत.
संबंधित बातमी मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेला, काकासाहेब शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता
गंगापूर तालुक्यातल्या कायगाव टोक्यावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात उडी मारली. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड केली.