मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्यादृष्टीने अतिश्य महत्त्वाचा मानला जाणारा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्य सरकारकडे सुपूर्द केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अहवालात नक्की काय असणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अहवालात ममूद करण्यात आलेल्या बाबी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्यादृष्टीने अनुकूल आहेत. या अहवालात गुणांकन पद्धत वापरण्यात आलीय. मागासलेपणाच्या निकषांना गुण देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार मराठा समाजाला २५ पैकी २१ गुण देण्यात आले आहेत. तर शैक्षणिक मागासलेपणाच्या बाबतीत मराठा समाजाला ८ पैकी ८ गुण देण्यात आलेले आहेत. याशिवाय, सामाजिक मागासलेपणासाठी १० पैकी ७.५ गुण देण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासलेपणात ७ पैकी ६ गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांशी बोलताना आरक्षणासंदर्भातील वैधानिक बाबी पुढच्या पंधरा दिवसांत पूर्ण होणार असल्याचे आश्वासन दिले.