तर तुमचा मास्क लावेल 'व्हायरल इन्फेक्शन'चीही वाट...

मास्क लावलेली व्यक्ती रोगी समजली जात होती पण आता...

Updated: Mar 25, 2020, 11:48 AM IST
तर तुमचा मास्क लावेल 'व्हायरल इन्फेक्शन'चीही वाट... title=
संग्रहित फोटो

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : मास्क हा इंग्रजी शब्द असला, तरी मराठीत मास्क म्हणजे वेसन, तोंडाला लावण्याचं वेसनं. मराठीतल्या बोली भाषेत याला वेगवेगळे शब्द आहेत. हे वेसन बैलांना लावलं जातं, जेव्हा उभ्या पिकात कोळपणी केली जाते आणि बैलाने पिक खाऊ नये, यासाठी. आता हे वेसन व्हायरस आणि प्रदुषित हवेतील कण शरीरात जावू नये म्हणून लावलं जात आहे.

कोरोनाला संपवण्याचा संकल्प तर सर्वांनी केलाच आहे. पण कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी मास्क नावाची ढाल सर्वांनी अंगीकारली आहे.

मास्क लावलेली व्यक्ती रोगी समजली जात होती पण आता...

कोरोना येण्याआधी एखाद्या व्यक्तीने मास्क लावलेला असला तरी त्याला रोगी समजलं जात होतं.  या व्यक्तीला कोणतातरी भयानक आजार झाला आहे, अशा नजरेने त्याच्याकडे पाहिलं जात होतं.

ज्या लोकांवर नुकत्याच मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. किडनी ट्रान्सप्लान्टसारख्या अशा लोकांना डॉक्टर काही दिवस मास्क वापरण्याची सूचना देतात.

जेणे करून व्हायरल इन्फेक्शन होवून सर्दी, खोकला आणि ठसका आल्यानंतर त्रास होवू नये, अशा लोकांकडेही मास्क लावल्याने याआधी विचित्र नजरेने पाहिलं जात होतं.

कोरोनामुळे मास्क ढाल

पण आता कोरोनाने परिस्थिती नेमकी याच्या उलट केली आहे. आता ज्याने मास्क लावला नाही, त्याच्याकडे अशा नजरेने पाहिलं जातं, याला काही त्याच्या जिवाची परवा तर नाहीच पण दुसऱ्याच्या जिवाचं तर याला काहीच नाही.

वास्तविक, ज्यांना सर्दी, खोकला किंवा शिंका येत असतील त्यांनी मास्क वापरायला हवा, किंवा ज्यांना याआधीच काही व्याधी आहेत.

मास्क नेहमीच अशा परिस्थितीत वापरावा

दम लागणे, दमा किंवा श्वास घेण्यास आधीपासून त्रास आहे. अशा लोकांनी मास्क वापरणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्यांनी कोरोनाची बाधा व्हायलाच नको यासाठी आधीपासून काळजी घ्यायला हवी.

कोरोनाआधी आपले सर्वात जवळचे आणि ओळखीचे शब्द आहेत. व्हायरल इन्फेक्शन आणि फ्लू. या फ्लू आजारानेही जगात कोट्यवधी लोकांचे जीव घेतले आहेत.

व्हायरल इन्फेक्शनने तुमचे अनेक आठवडे त्रासदायक गेले आहेत.

पण यापुढे ज्यांना ज्यांना व्हायरल इन्फेक्शन होईल, फ्लू होईल, खोकला येत असेल, नाक वाहत असेल, अशा वेळी सर्वांनी मास्क वापरला किंवा रूमाल वापरला पाहिजे.

व्हायरल इन्फेक्शन अत्यंत कमी होईल

कारण थुंकी किंवा शिंक आल्यानंतर उडणार फवारे हाताने रोखले, तर साधा फ्लू आणि व्हायरल इन्फेक्शन नावाचा प्रकार देखील हद्दपार होईल.

फ्लूचे अनेक प्रकारचे विषाणू आहेत. फ्लूची बाधा झाल्यानंतर मास्क वापरण्याची सर्वांनी काळजी घेतली तर नक्कीच फ्लू, व्हायरल इन्फेक्शन आणि यांचा या क्षणीचा सर्वात धोकादायक भाऊ कोरोनालाही थांबवता येईल.

सर्दी, खोकल्यात मास्क वापरणे शहाण्या माणसाचं लक्षण

कोरोनानंतर कुणी मास्क वापरला तर तो भयंकर आजाराने ग्रस्त असलेला इसम आहे. असा गैरसमज किंवा नजरेचे बाण त्याला मारण्याचीही गरज शहाण्या माणसाला आता उरणार नाही. हे कोरोनाच्या त्रासानंतर जवळ-जवळ सर्वांना पटलेलं आहे.