माथेरान : अपघातांमुळे वर्षभर यार्डात असणारी बच्चे कंपनीची आवडती ‘माथेरानची राणी’ एकदाची सुरू करण्यात आली आहे. आजपासून माथेरानच्या राणीचा प्रवास सुरू होणार असून सुरूवातीला शटल सर्व्हीस म्हणून अमन लॉज ते माथेरानपर्यंतच ती चालविण्यात येणार आहे.
माथेरानची मिनी ट्रेन रुळावरुन घसरण्याच्या सलग दोन घटना २०१६ मधील एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला घडल्या. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. मध्य रेल्वे प्रशासनाने कामात हलगर्जी केल्याबद्दल एका कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई देखील केली.
यानंतर रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सुरक्षा उपाय योजण्यासाठी चार सदस्यांची एक स्वतंत्र समितीही स्थापना करण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालाप्रमाणे मिनी ट्रेनमध्ये सुधारणा करण्याबरोबरच प्रवाशांसाठी सुरक्षेचे उपाय करण्यात आले.
या गाडीला एअर ब्रेक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसच सुरक्षेसाठी घाट सेक्शनमध्ये दरीच्या कडेला ६५० मीटरची भिंतही बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.