आघाडीत नाराजी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक

महाराष्ट्र विकासआघाडीत कुरबुरी वाढत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.  

Updated: Jul 3, 2020, 11:47 AM IST
आघाडीत नाराजी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक title=

दीपक भातुसे / मुंबई : महाराष्ट्र विकासआघाडीत कुरबुरी वाढत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी अंतर्गत नाराजी दिसून येत आहेत. निर्णय प्रक्रियेत सगळ्यांना सामावून घेत नसल्याचे सांगितले जात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबतचा निर्णय परस्पर घेतल्याने नाराजीचे वृत्त आहे. या नाराजीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात काल संध्याकाळी वर्षा निवसस्थानी ही बैठक झाली. यावेळी लॉकडाऊन आणि राज्याच्या आर्थिक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आघाडीतल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर बैठक झाल्याची माहिती आहे. परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता.  त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा इथं काल संध्याकाळी अजित पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बैठक झाली. मात्र, बैठकीचा अधिक तपशिल मिळू शकलेला नाही. 

विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे समोर आले होते. मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. निर्णय घेण्याआधी मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचं काही मंत्र्यांचं मत आहे.

तसेच महाविकासआघाडीचे नेते शरद पवार यांच्याकडे याबाबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. काल शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा देखील केली. नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात उद्या भेट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली.