Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?

Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

सायली पाटील | Updated: Jul 20, 2024, 10:01 AM IST
Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?  title=
Mhada homes scheme soon to develop more than 33000 slum area

Mhada Homes : पुणे आणि मुंबई (Mhada Pune and Mumbai Lottery) मंडळातील म्हाडाच्या सोडतींची जोरदार चर्चा सुरु असतानाच आता म्हाडाच्या आणखी एका नव्या योजनेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या योजनेमध्ये शहरातील एक मोठा भाग महामंडळ विकसित करणार असून, यामुळं सामान्य आणि गरजवंतांसह म्हाडाचाही फायदा होणार आहे. 

नव्या योजनेसह म्हाडा सज्ज 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर इथं म्हाडानं नवी योजना दृष्टीक्षेपात आणली असून, येत्या काळात मुंबई शहरातील जवळपास 17 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत असणारे आणि रखडलेले प्रकल्प म्हाडा येत्या काळात पूर्ण करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या योजनेसाठीचा प्रस्ताव येत्या काळात म्हाडाकडून राज्य शासनापुढे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत म्हाडाकडून जवळपास 33000 झोपड्यांचं पुनर्वसन होणार असून, या प्रक्रियेदरम्यान म्हाडालाही फायदा होताना दिसणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवा

म्हाडाच्या भूखंडा गेल्या काही काळापासून काही बराच काळ प्रलंबित होत्या. आता मात्र त्या मार्गी लागणार असून, यामध्ये गोरेगावमधील 10, कुर्ल्यातील 3, वांद्रे येथील 2 आणि बोरिवलीतील 2 झोपडपट्टी वस्त्यांचा समावेश आहे. 

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल 

मुंबई शहराचा सर्वांगीण विकास करत असताना त्यामध्ये शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचं धोरण केंद्रस्थानी ठेवत त्या दृष्टीनं सध्या पावलं उचलली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला पुन्हा मिळालेला वेग. झोपु योजनेतील अनेक वस्त्यांची कामं आर्थिक अडचणींमुळं रखडली. ज्यामुळं अनेकांचीच हक्काच्या घराची प्रतीक्षाही लांबणीवर पडली. राज्य शासनानं यामध्ये लक्ष घालत संबंधित कंत्राटदार- विकासकांवर कारवाई करत आता हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्याचं कळत आहे. 

खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच काही दिवसांपूर्वी म्हाडापासून सिडको, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, महाप्रितच्या अख्तयारित येणारे प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना केल्यानंतर त्या धर्तीवर हालचाली सुरु झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.