Mhada Lottery 2024 : हक्काचं आणि स्वप्नातलं घर... हा विषय जरी मनात डोकावून गेला तरीही तिथं लगेचच म्हाडाचा उल्लेख होतो. किमान आणि खिशाला परवडणाऱ्या दरात म्हाडाच्या वतीनं शहरातील विविध भागांमध्ये आणि विविध प्रकल्पांअंतर्गत राज्याच्या विविध ठिकाणांवर सोडतीच्या माध्यमातून इच्छुकांना घरं उपलब्ध करून दिली जातात. म्हाडाच्या सोडतीली दरवर्षी प्रतीक्षा होते किंबहुना म्हाडाच्या प्रत्येक अपडेटची प्रतीक्षा कैक मंडळींना लागलेली असते. याच म्हाडाकडून एक आनंदाची बातमी नुकतीच समोर आली आहे.
सामान्यांना जीवनशैलीच्या नव्या स्तरावर नेणाऱ्या आणि त्यांना सुरेख असं घर मिळवून देण्यात हातभार लावणाऱ्या म्हाडालाच आता एकदोन नव्हे, तब्बल 700 घरांची लॉटरी लागली आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत उपनगरात असलेली घरं आपत्कालीन परिस्थितीमध्ये गरजवंत रहिवाशांना देण्यासाठी उपलब्ध असावीत या कारणानं ती म्हाडाला देण्यात येणार आहेत.
डाला देण्यात येणाऱ्या या घरांवर धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचा हक्क असून त्यांना स्थलांरित करण्यासाठी किंवा संक्रमण शिबिरासाठी या घरांचा वापर केला जाणार आहे अर्थात पुनर्विकासाच्या कामानंतर ही घरं परत करणं अपेक्षित असेल. मुंबईतील धारावी येथे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत 334 घरं भाडेतत्त्वावर दिली जात असतानाच आता यामध्ये उपनगरातील घरांची भर पडणार आहे.
म्हाडाला दिल्या जाणाऱ्या या घरांमध्ये मुलुंड, कांदिवली, भांडुप, मानखुर्द, नाहूर, गोरेगाव अशा 17 विविध ठिकाणी असणाऱ्या 700 घरांचा समावेश आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत म्हाडाला दिली जाणारी घरं 225 चौरस फूटांची असून, बऱ्याच दिवसांपासून ती बंद असल्यामुळ त्यापैकी काही घरांची अंशत: दुरूस्ती करावी लागणार आहे.
वरील योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या या घरांचा वापर म्हाडाला आपल्या सोयीनुसार करता येणार आहे. ही घरं परत करण्याच्या अटीवर गरजवंतांना विनामुल्य दिली जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या स्थलांतरासाठी म्हाडापुढं असणाऱ्या अडचणी कमी होणार असं म्हणायला हरकत नाही.