MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईट

MHADA Fake Website : हक्काच्या घराच्या शोधात तुम्ही म्हाडापर्यंत पोहोचलात खरं, पण फॉर्म भरताय ती वेबसाईट खरी आहे का? आधी पाहून घ्या नाहीतर... 

सायली पाटील | Updated: Aug 22, 2024, 12:17 PM IST
MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईट title=
mhada lottery 2024 two people arrested for making fake website latest news and update

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये असणाऱ्या म्हाडाच्या (MHADA Fake Website ) घरांसाठीची सोडत जाहीर करण्यात आली आणि अर्ज भरण्यासाठी अनेक इच्छुकांनी घाई केली. म्हाडाच्या मदतीनं मुंबईसारख्या शहरात हक्काचं घर असावं, ही इच्छा मनी बाळगत अनेकांनीच अनामत रक्कम तयार ठेवत अर्जही भरले. पण, अशा सर्वांनाच आता सावध होण्याची गरज आहे. कारण, स्वप्नाच्या घराचा शोध घेताना बनावट संकेतस्थळामुळं तुमचा स्वप्नभंग होऊ शकतो. 

म्हाडाच्या (Mhada Lottery 2024) घरांची सोडत निघाली असून त्याची हुबेहूब नकली वेबसाइट तयार करून जनसामान्यांना फसवणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फसवी वेबसाईट तयार करणारे हे तरुण उच्चशिक्षित असल्याचा खळबळजनक खुलासा आता झाला आहे. ओमकार शिंदे आणि सत्यम तिवारी (अनुक्रमे वय 26 आणि 25 वर्षे) अशी या आरोपींची नावं. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 'वन टेक मीडिया कंपनी'त ही दोघंही वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून कार्यरत होते. 

कशी बनवली फसवी वेबसाईट? 

मुंबईतील (Mumbai News) डिलाईल रोड येथील रहिवासी असलेला ओमकार बीकॉमपर्यंत शिकला असून, तो वरील कंपनीत ग्राफिक डिझायनर होता. तर, अटकेत असणारा दुसरा आरोपी, सत्यम पालघरचा रहिवासी असून, तो वन टेकमध्ये अँड्रॉइड डेव्हलपर म्हणून काम पाहत होता. दरम्यान, या दोघांना ताब्यात घेण्यापूर्वी गुन्हे शाखेने कल्पेश सेवक आणि अमोल पटेल या दोघांवरही अटकेची कारवाई केली होती. अमोल पटेल हा खुद्द एक शिक्षक असल्याचं सांगितलं जातं. 

जिथं नागरिकांना स्वप्नांच्या घरांची प्रतीक्षा असते त्याच सर्वांच्या स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईट तयार करणाऱ्या या संपूर्ण रॅकेटचा शोध आता पोलीस यंत्रणा घेत आहे. या संपूर्ण फसवणुकीमध्ये पटेलकडे घरांसाठी अर्ज भरण्यास इच्छुक असणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपण म्हाडाचे अधिकारी असल्याचं भासवण्याची जबाबदारी होती. तर, यातील कल्पेश सेवकच्या खात्यावर फसवणूक करून मिळवलेली अनामत रक्कम आणि पुढील व्यवहारातील पैसे जमा होणं अपेक्षित होतं. सोडत प्रक्रियेतील दलालांच्या मदतीनं  या टोळक्यानं नागरिकांना गंडा घातल्याची धक्कादायक बाबा इथं समोर आली. 

हेसुद्धा वाचा : Cidco lottery : उरले फक्त काही दिवस; 'या' मुहूर्तावर जाहीर होणार सिडकोची नवी गृहयोजना

 

म्हाडाच्या या गृहयोजनेमध्ये लाखोंचे व्यवहार होत असून, या टोळीकडून सामान्य नागरिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला जात होता. तंत्रज्ञानाचा वापर करत हायटेक फसवणूक करणाऱ्या या टोळीमागे आता आणखी किती जणांचा हात आहे याचाच शोध पोलीस घेत असून, म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांनी अतिशय सावधगिरी बाळगत अधिकृत संकेतस्थळांवरूनच फॉर्म भरावेत आणि दलाल किंवा इतर कोणत्याही त्रयस्त व्यक्तीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे.