MHADA Lottery Homes : खिशाला परवडणाऱ्या दरात घर पाहण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची संधी या सर्वांनाच मिळते अशी नाही. अनेकदा आर्थिक आव्हानांमुळंच घराचं स्वप्न अपूर्ण राहतं. अशा सर्व मंडळींसाठी म्हाडा आणि सिडकोसारख्या गृहनिर्माण संस्था बरीच मदत करतात. याच म्हाडाच्या वतीनं आता जवळपास 14 हजार घरांसाठी प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्त्वाअंतर्गत घरं वितरित केली जाणार आहेत.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीनं पंतप्रधान आवास योजनेत जाहीर करण्यात आलेल्या कल्याण, विरार आणि ठाण्यातील अल्प उत्पन्न गटातील घरांना जाहीर करण्यात आलेल्या सोडतीतून फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळं ही घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर
उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या घरांसाठी एक मोहिम हाती घेतली जात असून विविध ठिकाणी या घरांसंदर्भातील माहिती दिली जाणार आहे. 2 डिसेंबर ते 11 डिसेंबरदरम्यानच्या काळात 29 स्टॉलच्या माध्यमातून ही माहिती दिली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार म्हाडाच्या या घरांमध्ये ठाणे तालुक्यातील गोठेघर आणि भंडार्ली, विरार येथील बोळींज, कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण अशा एकूण 14047 येथील सदनिकांचा समावेश आहे.
म्हाडाकडून ऑक्टोबर 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या गृहयोजनेनंतर लगेचच विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागली आणि जाहिरातीकरणावर मर्यादा आल्यामुळं ही योजना अनेकांपर्यंत पोहोचली नाही. घरांच्या जाहिरातींकडे अनेकांनीच पाठ फिरवली आणि या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ज्यामुळं आतापर्य़ंत या योजनेतील 14047 घरं अद्यापही पडून असल्याचं सांगण्यात येत आहे. हीच घरं आता नव्यानं जाहिरात करत त्यांची विक्री करण्याचा मानस म्हाडानं बाळगला असून, त्यासाठीच कोकण मंडळाकडून विविध प्रयत्न केले जात असल्याची बाब समोर येत आहे. तेव्हा आता घराचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांसाठीच ही सुवर्णसंधी ठरेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.