मुंबई : कोकणातला बहुचर्चित रिफायनरी प्रकल्प नाणार ऐवजी बरसू गावात हलविण्यात येणार आहे. मात्र, अद्याप शासन स्तरावर याचा निर्णय झालेला नाही. परंतु, बरसू गावातच हा प्रकल्प होण्याची शक्यता गृहीत धरून परप्रातिंयानी येथील हजारो एकर जमिनी खरेदी केल्या आहेत.
शाह, चोटाल्या, कोठारी, गुप्ता, राहिज, वांका अशी आडनावे असलेल्या लोकांकडून या जमिनी खरेदी करण्यात आल्यात. यात जम्मू - काश्मीर, पश्चिम बंगाल, ओडिशा, युपी, कर्नाटक या पाच राज्यातील आणि नागपूर, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नाशिकमधील अनेकांनी या जमीन खरेदी केल्या आहेत.
झी २४ तासने यासंदर्भातील बातमी दाखविताच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कोकणातील रिफायनरीच्या ठिकाणी कुणी जागा खरेदी करायचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू असा इशारा दिलाय.
रिफायनरी प्रकल्प कुठे करायचा याबाबत दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घेऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल. आम्ही शेतकऱ्यांशी बांधील आहोत. तसेच, कोकणात प्रोजेक्ट येतात याची माहिती बाहेरच्यांना कशी मिळते. ही चेन थांबवली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून हे कसे थांबवता येईल हे पाहिलं जाईल, असं म्हटलंय.