आरोग्यमंत्र्यांकडून 'मिशन कवच कुंडल'ची घोषणा, काय आहे ही योजना?

१५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत देशात १०० कोटी लसीकरण होणार

Updated: Oct 7, 2021, 11:45 AM IST
आरोग्यमंत्र्यांकडून 'मिशन कवच कुंडल'ची घोषणा, काय आहे ही योजना?  title=

मुंबई : आजपासून मंदिरे खुली झाली आहेत. ऑक्टोबर महिन्यात अनेक गोष्टी अनलॉक झाल्या आहेत. राज्यात लसीकरणाचा वेग देखील वाढला आहे. असं असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 'मिशन कवच कुंडल'ची घोषणा केली आहे. अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून त्यासाठी वेगाने पूर्ण जनतेचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात दसऱ्यापर्यंत १०० कोटी लसीचे डोस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारचे आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘मिशन कवच कुंडल’ योजनेची घोषणा केली आहे. मंदिरे सुरू झाली आहेत, मात्र नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाह न आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे. 

काय आहे 'मिशन कवच कुंडल'?

१५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत देशात १०० कोटी लसीकरण व्हावं असं केंद्रानं ठरवलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र देशातल्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी नाही. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील माझ्याशी फोनवर चर्चा करून राज्याचा या १०० कोटींच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी आपण मिशन कवच कुंडल योजना ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत राबवणार आहोत. रोज किमान १५ लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य आपण ठेवलं आहे. पूर्वी लस उपलब्ध नसायची तशी परिस्थिती आता नाही. या क्षणाला ७५ लाख लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत. २५ लाख आज उपलब्ध होतील. त्यामुळे १५ लाख लसीकरण रोज केलं तर ६ दिवसांत हा स्टॉक पूर्णपणे संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला दिलं आहे, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.

दररोज १५ लाख लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवत आहोत.  सहा दिवसात ९० लाख लसीकरण करायचे आहे तेवढा स्टॉक आपल्याकडे आहे. राज्यात ९ कोटी १५ लाख लसीकरणाचे दोन्ही डोस करायचे आहेत.  यापैकी पहिला डोस ६ कोटी झाले आहे. ३ कोटी २० लाख शिल्लक आहे.  दुसरा डोस २.५ कोटी झाले आहे.  ६५ टक्के पहिले डोस पूर्ण केले आहेत. ३० टक्के दोन्ही डोस पूर्ण केले आहे.  यामुळे तिसर्‍या लाटेची भीती कमी होईल असे आम्हाला वाटते, असंही आरोग्यमंत्री म्हणाले. 

तिसऱ्या लाटेची भीती कमी झाल्यामुळे डेथ रेटला लगाम बसेल.  काल संध्याकाळी राज्याचे सर्व जिल्हाधिकारी, सीईओ आणि सर्व आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून लसीकरणाचा कार्यक्रम ठरवला आहे.  यात अंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग, महसूल कर्मचारी यांच्या सहकार्याने हे केलं जाणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने सलग ७५ तास लसीकरण सुरू ठेवले.  केंद्र सरकारने ५० हजार रुपये कोरोना मृताच्या नातेवाईकांना देण्याच्या सूचना दिल्या आहेत.  आपण हे ५० हजार रुपये देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्याच्या SDRF निधीतून हा निधी दिला जाईल. १ लाख ४० हजार कोरोनामुळे मृत झाले आहेत.  ५० हजार प्रमाणे ७०० कोटी रूपये यासाठी लागणार आहेत.  वारसांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.