मुंबई : कांद्याच्या कोसळलेल्या भावाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बागलणच्या आमदार दीपिका चव्हाण आज विधानसभेत गळ्यात कांद्याची माळ घालून आल्या होत्या. भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून सरकारने त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
राज्यातील शेतकरी दुष्काळानं पिचलेला असताना त्याचा शेतमालही कवडीमोल दरानं विकला जातोय. कांदा आणि टोमॅटोला आता चलनात अस्तित्वात नसलेल्या नाण्यांच्या दर मिळतोय. संगमनेरमध्ये कांद्याला १३ पैसे किलोचा दर मिळालाय. तर मालेगावात टोमॅटोला ५० पैसे किलोचा भाव मिळालाय. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय.
संगमनेर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी सिद्धु घुले यांनी कांदा पीक घेतले. भयान दुष्काळी स्थितीतही अपार मेहनत घेत त्यांनी आपल्या शेतात कांदा पिकवला. मात्र ६५३ किलो कांदा विकून त्यांच्या पदरात केवळ ५० रूपये पडले. मातीमोल भावात विकलेल्या या कांद्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण पसलंय. तर दुसरीकडे मालेगावात टोमॅटोला अवघा ५० पैसे किलो भाव मिळाल्याने संतप्त शेतकर्याने टोमॅटो रस्त्यावर फेकला.
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डीचे तरुण शेतकरी योगेश ठाकरे यांनी वडनेरच्या आठवडे बाजारात टोमॅटोचे २० कॅरेटविक्रीसाठी आणले होते . मात्र त्यांना किलोला अवघा ५० पैसे दर मिळाल्याने संतप्त झालेल्या ठाकरे यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला.