मुंबई : MLA Ravi Rana criticizes Sanjay Raut : आमदार रवी राणा यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका केली आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. 'संजय राऊत हा चवन्नी छाप माणूस आहे. आमच्यात घरात बांधकामाबाबत कुठलेही उल्लंघन झालेले नाही, आमच्यावर सुडाने कारवाई महानगरपालिका करत आहे,' अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.
'खासदार नवनीत राणा यांची तब्बेत ठीक आहे. आज त्यांना डिस्चार्ज मिळेल,' अशी माहिती पती रवी राणा यांनी दिली. आता लढण्याच्या निर्धाराने त्या बाहेर पडणार आहेत. आमच्यावर दबाव टाकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारवाई करत आहेत. मुख्यमंत्री कोणाला भेटत नाहीत. जिल्ह्यात फिरत नाहीत आणि मंत्रालयात येत नाहीत. तसेच आमदार, खासदार यांना भेटत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत की नाही हेच माहीत पडत नाही, अशी टीका राणा यांनी केली.
'आम्हाला जो त्रास झाला त्याची तक्रार एक ते दोन दिवसात दिल्लीत करणार आहोत. संजय राऊत आणि मंत्री अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत, त्यांना ही आम्ही तुरुंगात टाकू,' असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. सकाळी 11 वाजता लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. लीलावती रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर खार इथल्या त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. चार मे रोजी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. पाच मे रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. मानदुखीचा त्रासामुळे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.