मनसेच्या एकमेव नगरसेवकाचा गौप्यस्फोट

दिवाळीआधी शिवसेनेनं मुंबईच्या राजकारणामध्ये बॉम्ब फो़डला आहे. 

Updated: Oct 13, 2017, 11:48 PM IST
मनसेच्या एकमेव नगरसेवकाचा गौप्यस्फोट title=

मुंबई : दिवाळीआधी शिवसेनेनं मुंबईच्या राजकारणामध्ये बॉम्ब फो़डला आहे. मुंबईतल्या मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले आहेत. अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर, दिलीप लांडे, हर्षला मोरे आणि दत्तात्रय नरवणकर हे सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत.

या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर आता मनसेमध्ये केवळ एकच नगरसेवक उरला आहे. कुर्ल्यातले कलिनामधले वॉर्ड क्रमांक १६६चे नगरसेवक संजय तुरडे हे अजूनही मनसेमध्ये आहेत. या सगळ्या प्रकारानंतर संजय तुरडे यांनी शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

दिलीप लांडे हे स्वत:च्या आमदारकीच्या सोयीसाठी शिवसेनेत गेले आहेत, असा आरोप संजय तुरडेंनी केला आहे. दिलीप लांडेंनी सगळ्याचं नेतृत्व केलं, सगळे नगरसेवक स्वत:च्या स्वार्थासाठी शिवसेनेत गेल्याची टीका तुरडेंनी केली आहे. तसंच या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मोठा व्यवहार झालाय, गेल्या सात-आठ दिवसांपासून हे सगळं सुरु होतं, असा गंभीर आरोप तुरडेंनी केलाय. दिलीप लांडे हे मराठी महापौर असावा म्हणून सेनेत आल्याचं लोकांना भुलवण्यासाठी सांगत असल्याचं तुरडे म्हणालेत. 

मनसेचे हे नगरसेवक शिवसेनेत

अर्चना भालेराव – वॉर्ड क्रमांक १२६

परमेश्वर कदम – वॉर्ड क्रमांक १३३

अश्विनी माटेकर- वॉर्ड क्रमांक १५६

दिलीप लांडे – वॉर्ड क्रमांक १६३

हर्षला मोरे – वॉर्ड क्रमांक १८९

दत्तात्रय नरवणकर- वॉर्ड क्रमांक १९७