मुंबई: मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रात राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीतील समस्यांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. राजू पाटील यांनी म्हटले आहे की, मला कोणतीही टीका करायची नाही. मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे. डोंबिवलीतील वाढते प्रदूषण, शहराच्या दुरावस्थेसाठी जबाबदार एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.
तुम्हाला रामभाऊ म्हाळगीमध्ये सवलतीत ट्रेनिंग देऊ; शेलारांचा राऊतांना टोला
राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवली शहराची ओळख होती. पण हे शहर आता प्रदूषणाचे शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी बहुतांश भाग उद्योग, निवासी असा आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार बळावत आहेत. तसेच कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न जैसे थे असून तो दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था, नाले तुंबणे यासाठी हेच अधिकारी जबाबदार आहेत. याबाबत आम्ही सतत आंदोलन करुनही आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, याकडे राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
या सगळ्याबद्दल मला कोणावरही टीका करायची नाही. मात्र, मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. त्यांनी डोंबिवली शहरावर लक्ष द्यावे. डोंबिवलीत सुधारणा कराव्यात, अशी मागणी राजू पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.