तुम्हाला रामभाऊ म्हाळगीमध्ये सवलतीत ट्रेनिंग देऊ; शेलारांचा राऊतांना टोला

'सामना'तून सरकारची भूमिका कशी योग्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Updated: Jan 9, 2020, 07:08 PM IST
तुम्हाला रामभाऊ म्हाळगीमध्ये सवलतीत ट्रेनिंग देऊ; शेलारांचा राऊतांना टोला title=

मुंबई: जेएनयू विद्यापीठातील हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी 'फ्री काश्मीर'चा फलक झळकावणाऱ्या मुलीविरोधात सरकार पुराव्याआधारे कारवाई करत नसल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून या मुलीविषयी घेण्यात आलेल्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. 

शेलार यांनी 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनाही चिमटा काढला. आपण संपादक आहोत याचा विसर पडला असेल तर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये त्यांना विशेष सवलतीत ट्रेनिंग देऊ, असे शेलार यांनी म्हटले. यावेळी शेलार यांनी संजय राऊत यांचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांच्या या विधानाचा रोख संजय राऊत यांच्याच दिशेने होता. 

थेट उद्धव ठाकरेंना अंगावर घेणारे किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय

जेएनयूतील हिंसाचाराविरोधात मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे निदर्शने झाली होती. त्यावेळी मेहक प्रभू या तरुणीने 'फ्री काश्मीर'चा फलक झळकावला होता. विरोधकांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर आज 'सामना'तून सरकारची भूमिका कशी योग्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मुलीला अभिप्रेत असलेला 'फ्री काश्मीर' म्हणजे देशातून फुटून निघणे, असे नव्हे. तर काश्मीरच्या नागरिकांवर जी बंधने लादली आहेत, त्यांना देशापासून तोडले आहे, इंटरनेट, मोबाईल आदी सुविधांपासून वंचित ठेवले आहे, त्यापासून काश्मीर मुक्त व्हावा, असे या तरुणीने स्पष्ट केले. त्यामुळे भाजप सरकार तोंडघशी पडल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. 

मात्र, आशिष शेलार यांनी सरकार पोलिसांवर दबाव टाकून पुराव्यांशी छेडछाड करत असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रातील सरकार हे प्रकल्पांचा रिव्ह्यू घेऊन ते बंद करत आहे. तसेच तक्रारींचा रिव्ह्यू घेऊन त्याही निकालात काढल्या जात असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.