जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर, मनसेने एक व्हिडीओ जारी केला आहे, फेसबुकवर मनसे अधिकृत या पेजवर हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राजकारणात असं म्हणतात की, पब्लिक मेमरी ही शॉर्ट मेमरी असते, म्हणून राजकारणात काही घटनांची, भूमिकेची वेळोवेळी जनतेला आठवण करून देणे गरजेचे असते. मनसेनेही सध्याच्या परिस्थितीशी साधर्म्य आणि परिस्थितीला उत्तर देणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
मनसेनेही राज ठाकरे यांच्या ,18 ऑक्टोबर 2011 रोजीच्या पदाधिकारी मेळाव्यातील व्हिडीओचा निवडक भाग प्रसिद्ध केला आहे, यात थोडक्यात जनतेला, टिकारांना आणि भाजप-शिवसेनेला राज ठाकरे यांच्या भूमिकेची आठवण करून देण्याचा हा मनसेचा प्रयत्न आहे.
या व्हिडीओतून कदाचित मनसेला असंच सांगायचं आहे, जे आम्ही करतो ते स्पष्टपणे करतो, आणि नितीमत्ता सांभाळून... आणि आताच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, आम्ही जे काही केलं असतं, तर ते उघडच केलं असतं.
मनसेच्या व्हिडीओवर सुरूवातीला 2 वाक्य येतात, 'हा नेता नितीमत्तेने वाटचाल करतो', 'स्वाभिमानाने समोरून लढतो'
यानंतर राज ठाकरे व्हिडीओत बोलताना म्हणतात,'मी राजकीय पथ्य पाळणाऱ्यातील माणूस आहे, व्यवहार मलाही कळतात, परंतू या व्यवहाराच्या पलीकडे काही गोष्टी असतात, काही वेळा माणुसकी असते'.
राज ठाकरे यांनी यावेळी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादीने तिकिट दिलं होतं.
तेव्हाची आठवण करून देताना राज ठाकरे म्हणतात, 'तेव्हाही आपण खडकवासला पोटनिवडणूक पक्षाने लढू नये, असा निर्णय घेतला होता, कारण असल्या घाणेरड्या गोष्टी मला आवडत नाहीत.
एवढंच नाही, माहिम आणि कल्याणमधील नगरसेवकांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीला आपण उमेदवार दिला नाही, कारण निधन झालेल्या निधन झालेल्या माणसांची खरडपट्टी काढायची, हे मला जमणार नाही.
ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची असू दे, या बाबतीतच्या संवेदना माझ्या आजही जिवंत आहेत, जे मला करायचंय ते लोकांचा विश्वास संपादन करूनच कराचंय, असंही राज ठाकरे या व्हिडीओत म्हणाले आहेत. 2011 सालचा व्हिडीओ थोडक्यात प्रसिद्ध करून मनसेने एकाच दगडात सर्वांना चपराक लगावली आहे.