मनसेने दिले युतीचे संकेत? बाळा नांदगावकर म्हणाले 'लवकरच चांगली-वाईट बातमी मिळेल'

मनसे अॅक्शन मोडमध्ये, राज ठाकरे करणार महाराष्ट्राचा दौरा

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Dec 14, 2021, 11:06 PM IST
मनसेने दिले युतीचे संकेत? बाळा नांदगावकर म्हणाले 'लवकरच चांगली-वाईट बातमी मिळेल' title=

देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : राज्यातील आगामी महापालिका, नगरपंचायत किंवा नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष रणनिती आखतायत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेही (MNS)  अॅक्शन मोडमध्ये आली आहे. यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सज्ज झाले असून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. 

राज ठाकरे यांनी नुकतीच कोरोनावर मात केली. आणि आता ते पुन्हा कामाला लागले आहेत. शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राज ठाकरे यांनी पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावर  (Bala Nandgaokar) यांनी याबाबताची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असून दौऱ्याची सुरुवात 6 डिसेंबरपासून होणार आहे. राज्यातील 6 विभागांमध्ये हा दौरा असून मराठवाडा आणि पश्चिम दौऱ्यांच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. 6 डिसेंबरला राज ठाकरे पुण्याचा दौरा करणार असून तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताली. त्यानंतर 14 डिसेंबरला औरंगाबाद आणि 16 डिसेंबरला पुन्हा पुण्यात पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे कोकणचा दौराही करणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मुंबईच्या दृष्टीनेही आमचं नियोजन सुरू असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र दौऱ्यात राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. आम्ही आतापर्यंत एकट्यानेच निवडणुका लढवल्या आहेत. सध्या आम्ही एकटा जीव सदाशिव आहोत,  पुढे काय होईल माहित नाही असं सांगत बाळा नांदगावर यांनी भविष्यात युती करण्याचे संकेत दिले आहेत. पण लवकरच चांगली वाईट बातमी मिळेल असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

दरम्यान, या बैठकीत भाजप-मनसे युतीचा विषय आल्याचं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं. मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांचं स्वबळावर निवडणुक लढली पाहिजे असं मत आहे. 

राज ठाकरे अयोध्येचा दौराही करणार आहेत. पण या दौऱ्याची तारीख अजून ठरली नसल्याचंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.