Monsoon : मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी, पुढच्या 5 दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होणार

उशीरा का होईना मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत संध्याकाळच्या सुमारास ढग दाटून आले आणि त्यानंतर धो-धो पावसाला सुरुवात झाली. राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 24, 2023, 06:59 PM IST
Monsoon : मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी, पुढच्या 5 दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होणार title=

Monsoon Update : राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून (Monsoon) बहुतांश भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं (Department of Meteorology) वर्तवलाय. कोकणात (Konkan) तसच विदर्भात (Vidarbha) काही दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्ये मुसऴधार ते अती मुसऴधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसच मराठवाडातही पावसाचा जोर राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 

मुंबईत रिमझिम पाऊस
जून महिना संपत आला तरी पावसाला कधी सुरुवात होणार याची प्रतीक्षा होती. पण उशीराने का होईना महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत सकाळपासूनच मळभ होतं. संध्याकाळी ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईत रिमझिम पाऊस बरसतोय. पुढील 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली.

नालेसफाईची पोलखोल
मात्र या पावसानं मुंबईतल्या नालेसफाईची पुन्हा एकदा पोलखोल केलीय. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालीय. दहिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पाणी तुंबल्यानं याठिकाणी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. याचा वाहतुकीवरही परिणाम झालाय. मुंबईतल्या नालेसफाईचे दावे प्रशासनाकडून करण्यात आलेत. मात्र हे दावे फोल ठरल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.  किरकोळ पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबत असेल तर मोठा पाऊस झाल्यानंतर इथली स्थिती काय असेल? असा सवाल आता दहिसरमधले नागरीक करतायेत. 

पुण्यातही पावसाची हजेरी
पुणे जिल्ह्यासह इंदापूरात पावसानं हजेरी लावलीये. दुपारच्या सुमारास दमदार पाऊस झाला.. पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. बारामती- इंदापूर रस्त्यावर काही भागात या पडलेल्या मुसळधार पावसानं पाणी साचलं होतं.

कल्याण-डोंबिवलीत ढगाळ वातावरण
कल्याण-डोंबिवली परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं.त्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. उकड्याने हैराण नागरिकांना हवेतील गारव्यानं काहीसा दिलासा मिळालाय .

नगरमध्ये जोरदार पाऊस
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील देवीभोयरे वडझिरे या भागात जोरदार पाऊस झाला आहे पहिल्याच पावसात शेतात पाणी साचले असून दोन्ही गावाच्या परिसरातील ओढे नाले भरून वाहू लागलेत. नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय. जोरदार पाऊस झाल्याने या भागातील शेतातील पेरण्या सुरू होणार आहेत.

पावसामुळे बळीराजा सुखावला
धाराशिव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भूम, परंडा, वाशी व कळंब या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली तर जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. तर आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा या पावसामुळे चांगला सुखावलाय.

बीड जिल्ह्यातही बरसला
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहर आणि परिसरातील काही भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळं उकाडयापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळालाय...जून महिना संपत आला मात्र आजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, त्यामुळं पेरण्या खोळंबल्यात. मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहे.