राष्ट्रवादीतील अस्वस्थता वाढली, हे दिग्गज नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत

आणखी काही मोठे नेते राष्ट्रवादीला रामराम करणार...

Updated: Aug 27, 2019, 03:34 PM IST
राष्ट्रवादीतील अस्वस्थता वाढली, हे दिग्गज नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एकीकडे यात्रांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र दुसरीकडे पक्षातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून चालल्याने ही अस्वस्थता वाढते आहे. विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, सचिन अहिर, पुसदचे मनोहरराव नाईक घराणे आणि आता दिलीप सोपल असे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एक एक करून पक्ष सोडत आहेत. ही यादी इथेच थांबत नाही. 

शरद पवारांचे निकटवर्तीय आणि पक्षाच्या स्थापनेपासून बरोबर असलेले आणखी काही नेते येत्या काही दिवसात पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. त्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, राणाजगजितसिंह पाटील, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, संध्या कुपेकर, गुलाबराव देवकर, दिलीप वाघ, ज्योती कलानी यांच्या नावाची भर पडणार आहे. पक्ष सोडून बाहेर पडणाऱ्यांना शुभेच्छा देण्यापलिकडे राष्ट्रवादीचे नेते काहीही करू शकत नाहीत.

हे सगळे दिग्गज नेते पक्ष सोडून जात असले तरी पक्षाला फरक पडत नसल्याचे पक्षाचे नेते सांगत आहेत. शरद पवार कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी इतिहासाचा दाखला देत आहेत. आपल्याला यापूर्वी सोडून गेलेले राजकारणात कुठेच नाहीत, असं ते सांगत आहेत. 

मात्र आधीच लोकसभा निवडणुकीतील पराभवाने पक्ष खचलेला आहे, त्यात एकएक करून दिग्गज नेते बाहेर पडत असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर मोठा परिणाम होत असतो आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणखी खचणार आहेत.

कोणत्याही पक्षाची खरी ताकद हे त्या पक्षाचे कार्यकर्ते असतात, मात्र राष्ट्रवादीने 15 वर्ष सत्ता असतानाही प्रत्येक जिल्ह्यात ठराविक नेत्यांनाच ताकद आणि वर्षानुवर्षे सत्तेतील पदे दिली. आता तेच नेते पक्ष सोडत असल्याने तिथले कार्यकर्तेही त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे आतापर्यंत निवडून येणारे बहुतांश दिग्गज आमदार हे स्वतःच्या ताकदीवर निवडून यायचे. तिथे पक्षाची ताकद नावापुरतीच होती. आता असेच नेते आणि त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले तर राष्ट्रवादीचे होणार काय याची चिंता पक्षातील वरिष्ठ नेत्यांना असून त्यामुळे त्यांची अस्वस्थता निश्चितच वाढणार आहे.