लोकलमध्ये अडकलेल्या २०० हून अधिकजणांच्या मदतीला रेल्वे पोलीस

अतिवृष्टीमुळं मुंबई ठप्प....   

Updated: Aug 5, 2020, 07:58 PM IST
लोकलमध्ये अडकलेल्या २०० हून अधिकजणांच्या मदतीला रेल्वे पोलीस
संग्रहित छायाचित्र

मुंबई : हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारपासूनच MUMBAI RAIN मुंबई आणि उपनगरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. काही दिवसांच्या लपंडावानंतर मुंबापुरीला पावसानं चांगलंच झोडपून काढलं. परिणामी शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे, तर लॉकडाऊन काळातही काही अंशी सुरु झालेल्या लोकल सेवाही या पावसामुळं ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. 

मस्जिद बंदर रेल्वे स्थानक येथे लोकलमध्ये अडकलेल्या २०० हून अधिक प्रवाशांना रेल्वे पोलिसांच्या मदतीनं सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. सध्या आणखी काही प्रवासी रेल्वेमध्ये अडकल्याची माहिती असून, त्यांनाही बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. या साऱ्यामघ्ये खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानं एन डी आर एफ लाही बोलावलं आहे. 

मुंबईत सुरु असणारी मुसळधार पाहता याचा फटका रेल्वे सेवेवर झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. पण, त्यातही पावसामुळं खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा लोकल वाहतूक बंद आहे. सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद आहे.

फक्त मुंबईच नव्हे, तर पश्चिम उपनगर, ठाणे आणि कोकणातही पावसानं सोमवारपासून चांगलाच जोर पकडल्याचं पाहायला मिळत आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातही मंगळवारपासून जोरदार पाऊस आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.