Sanjay Raut Bail Application Hearing : खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. ईडीच्या उत्तरावर न्यायालयाने आपला आजचा निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाने ईडीच्या उत्तरानंतर आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. याआधी ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तवाद करायचा आहे, असे न्यायालयाला सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने आजची तारीख दिली होती.
संजय राऊत यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात 31 जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. सुरुवातीपासूनच राऊत यांचा या घोटाळ्याशी कसलाही संबंध नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला आहे. तर राऊत हेच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार कसे आहेत, हे ईडीचे वकिल न्यायालयाला पटवून देत आहेत.
दरम्यान, 7 सप्टेंबर रोजी राऊत यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. मात्र तेव्हापासून न्यायालयाची तारीख पे तारीख सुरु आहे. राऊतांना दिलासा मिळताना दिसत नाहीय. राऊतांच्या जामीन अर्जावर 11 ऑक्टोबरला सुनावणी झाली होती. मात्र, वेळेअभावी त्यांचा युक्तिवाद पूर्णपण होऊ शकला नव्हता. त्यामुळं सुनावणी 17 ऑक्टोबरला घेण्याचे सांगितले होते. मात्र, पुन्हा एक दिवसाने सुनावणी पुढे ढकलत 18 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेतला होता. ती ही सुनावणी पूर्ण होऊ शकलेली नव्हती. आज पुन्हा सुनावणी झाली. पण ईडीच्या उत्तरानंतर राऊतांच्या जामीन अर्जावर आता 9 नोव्हेंबरला सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केले आहे.