Mumbai-Pune Shivneri: विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी व मामाच्या गावाला जाण्यासाठी मुलांची लगबग असते. मात्र, या दिवसांत बस, ट्रेन तुडुंब भरुन वाहत आहेत. एसटी बसमध्येही प्रवाशांची भरपूर गर्दी होत आहे. तसंच, प्रवाशांचा प्रवास वेगाने व्हावा व वेळेत बचत व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने शिवनेरी फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. अटल सेतूमार्गे धावणाऱ्या शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय परिवहन मंडळाने घेतला असून मुंबई-पुणे अटल सेूतुवरुन शिवनेरीच्या 15 फेऱ्या धावणार आहेत.
उन्हाळी सुट्टी आणि मुंबई-पुणे प्रवासासाठी प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळं प्रशासनाने ही गर्दी लक्षात घेता अटल सेतुवरुन धावणाऱ्या शिवनेरी बसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अटल सेतुमार्गे धावणाऱ्या शिवनेरीला वाशीतील वाहतुककोंडीचा सामना करावा लागत नाही. अटल सेतूमुळं मुंबई-पुणे प्रवास 3.30 तासात पूर्ण होतो. पूर्वी या प्रवासाला 4.30 तास लागायचे. त्यामुळं अटलसेतूमार्गे धावणाऱ्या शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी होत होती. प्रशासनानेही यावर लक्ष देत शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.
अटल सेतुवरुन पूर्वी फक्त दोनच शिवनेरीच्या फेऱ्या चालवण्यात येत होत्या. पुणे-मंत्रालय आणि स्वारगेट-दादर अशा दोन मार्गावर शिवनेरी धावत होत्या. आता प्रशासनाने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता शिवाजी नगर (पुणे) आणि स्वारगेट विभागाने प्रत्येकी पाच शिवनेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
- दादरवरुन स्वारगेटसाठी पहिली शिवनेरी पहाटे 5 वाजता सुटते.
- स्वारगेटवरुन दादरसाठी पहिली शिवनेरी पहाटे वाजता सुटते.
- मंत्रालय- पुणे रेल्वे स्थानक ही शेवटची शिवनेरी रात्री 11 वाजता सुटते.
मुंबई-पुणे मार्गावर दररोज अर्ध्या तासाच्या फरकाने शिवनेरीच्या एकूण 43 फेऱ्या धावतात. मुंबईवरून पुणे जाताना शिवडी - अटलसेतू – गव्हाण फाटा – कोन – यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्गे शिवाजी नगर पुण्याकडे रवाना होतात. या मुळं प्रवाशांची एक तासांची बचत होते, असं एसटी प्रशासनाने म्हटलं आहे.
मार्ग – भाडे
दादर-शिवाजी नगर - ५३५
स्वारगेट-दादर – ५३५
पुणे-मंत्रालय – ५५५