'जयपूर नको गोव्याला न्या'; शिवसेना आमदारांची मागणी

दिल्लीपाठोपाठ आता मुंबईतही सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. 

Updated: Nov 21, 2019, 05:06 PM IST
'जयपूर नको गोव्याला न्या'; शिवसेना आमदारांची मागणी

मुंबई : दिल्लीपाठोपाठ आता मुंबईतही सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका सुरू असताना शिवसेनेच्या गोटातही वेगाने घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या आमदारांना उद्या मुंबईत बोलवण्यात आलंय. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यानंतर या सर्व आमदारांना मुंबईहून जयपूरला रवाना करण्यात येणार आहे.

उद्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर हे सर्व आमदार जयपूरला रवाना होणार आहेत. मात्र शिवसेना आमदारांची गोव्याला जाण्याची इच्छा असल्याचं शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे.

'५ दिवसांसाठी आमदारांनी तयारीने यावं, असे आदेश आलेले आहेत. राज्यपालांना ओळख परेड करायची असेल तर सगळ्या आमदारांना पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन यायला सांगण्यात आलं आहे,' असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

'मागच्यावेळी आम्ही सगळे आमदार मुंबईत थांबलो होतो, तेव्हा गोव्याला घेऊन जायची इच्छा आमदारांनी व्यक्त केली होती. एकाच ठिकाणी एकाच हॉटेलमध्ये राहिल्यामुळे मन लागत नाही, त्यामुळे लोकांची गोव्याला जायची इच्छा होती. पुढच्यावेळी गोव्याला घेऊन जाऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते,' असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.