मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातही लागू करण्यात आलेल्या Lockdoen लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात दारु विक्री करणारी दुकानं सुरु करण्यापासून इतरही दुकानांवरील काही निर्बंध उठवून नियम शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. पण, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवल्यामुळे आता शिथिल करण्यात आलेलं लॉकडाऊन हे आहे त्याच नियमांनी सुरु राहणार आहे. किंबहुना येत्या काळात ते आणखी कठोर होऊ शकतं.
पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यासंदर्भातील माहिती देत मुंबईत अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळता इतर सर्व सवलती पुरवणारी दुकानं बंद राहणार असल्याची माहिती दिली. नियम शिथिलीकरणाला अपेक्षित शिस्तबद्ध पद्धतीने पाठिंबा मिळत नसल्यामुंळं हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करुन हा निर्णय घेतला गेला. परिणामी, बुधवारपासून पुन्हा एकदा शहर पूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
सोमवारपासून, मुंबई आणि देशातील काही भागांमध्ये दारुविक्रीची परवानगी देण्यात आली. अनेक राज्यांमध्ये एका दिवसात दारु विक्रीने कोट्यवधींची कमाईही झाली. पण, या साऱ्यामध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. त्यातच मुंबईत सातत्याने नियमांचं होणारं उल्लंघन पाहता अखेर सर्व सवलती मागे घेत लॉकडाऊनचं काटोकेरपणे पालन करावं असं आवाहन करण्यात आलं.
मुंबईत दारु दुकानं बंदच राहणार
शहरात मद्यप्रेमींकडून रांगेत सोशल डिस्टन्सिंगच्या कोणत्याही नियमांचं पालन केलं जात नव्हतं. दारू खरेदीसाठी लोक अक्षरशः एकमेकांवर अनेक ठिकाणी तुटून पडले होते. दारूची दुकानं सुरू करताना दुकानासमोर एकावेळी पाचच ग्राहक उभे राहतील अशी अट घालण्यात असतानाही त्याचं पालन केलं गेलंच नाही. नियमांची होणारी ही पायमल्ली आणि त्यातून कोरोनाचा फैलावच होण्याची भीती पाहता मुंबई महापालिकेने लॉकडाऊनची शिथिलता रद्द करत शहरात दारुची दुकानंही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.