मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील 19 महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका (Propertycard) आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशिल जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल ॲपवर पाहता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-प्रॉपर्टी कार्ड (ePropertycard) हे ॲप नागरिकांसाठी विकसित केले असून या ॲपचे मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी लोकार्पण केले. (Mumbai City Propertycard on Mobile App)
या ॲपची सुविधा मुंबई शहर जिल्ह्यासाठी असून पुढील काळात संपूर्ण राज्यासाठी ॲप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे ॲप गूगल प्ले स्टोअरवर सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना किंवा जमीनधारकांना जमिनीचा नकाशा, सीटी सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि प्रकार, करनिर्धारणा तसेच जमीनधारकाची माहिती कळेल. हे ॲप सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्मित केलेल्या या ॲपचा नागरिकांनी उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निवतकर यांनी यावेळी केले.
मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशील जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल ॲपवर पाहता येणार. जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ई-प्रॉपर्टी कार्ड (ePropertycard) ॲपचे लोकार्पण. pic.twitter.com/6lKWRNdBuQ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 18, 2021
या ॲपची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या mumbaicity.gov.in आणि prcmumbai.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमांतर्गत मुंबई शहर एनआयसीने ‘ई-प्रॉपर्टी कार्ड’ (ePropertycard) या ॲपची निर्मिती केली असून जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कविता पाटील आणि अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी अनिल राठोड यांनी हे ॲप विकसित केले आहे.