घाबरवण्याच्या बहाण्याने करायचा अश्लील चाळे, विक्रोळीतील शिक्षकाकडून 4 मुलींवर अत्याचार

Mumbai Crime : मुंबईत महापालिकेच्या शाळेत घाबरवण्याच्या नावाखाली मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरु आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 22, 2023, 01:06 PM IST
घाबरवण्याच्या बहाण्याने करायचा अश्लील चाळे, विक्रोळीतील शिक्षकाकडून 4 मुलींवर अत्याचार title=

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : विक्रोळी (Vikroli Crime) टागोरनगरमधील मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळेत चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. टागोरनगरमधील पालिकेच्या मुंबई पब्लिक हायस्कूल या शाळेतील पीटी शिक्षक सौरव उचाटे या शिक्षकाने दुसरीत शिकत असलेल्या चार विद्यार्थिनीचां लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पोलिसांनी (Mumbai Police) या शिक्षकाला विक्रोळी पोलीस ठाण्यात नेले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

शिक्षा देण्याच्या नावाखाली हा पीटी शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करत असल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दिली होती. त्यांनतर आज या पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. या वेळी पोलिसांनी पालकांना घरी जावे अशी विनंती केल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांचा निषेध ही केला. पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. लैंगिक छळाचा आरोप असलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी असे कृत्य करत असल्याचे सांगितले आहे. बोटावर चॉकलेट लावून ते बोट मुलांच्या तोंडात टाकल्यावर मुले घाबरत होती असे पीटी शिक्षकाने सांगितले आहे.

"पोलिसांना या घटनेचं गांभीर्य समजत नाहीये. विक्रोळी पोलीस हा प्रश्न दाबायचा प्रयत्न करत आहेत. पालक इतका गंभीर प्रश्न घेऊन आलेले असताना पोलीस त्यांना घरी जाण्यासाठी सांगत आहेत. मुंबईत अशा घटना सातत्याने घडत आहेत. पीडित दुसरी तिसरीचे विद्यार्थी आहेत. विक्रोळीत मुंबई पब्लिक स्कूल नावाची शाळा आहे. या शाळेमध्ये दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना पीटीच्या सरांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आहे. त्याची माहिती मिळताच पालक हे पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ शाळेत धाव घेतली आणि तपासाठी त्याला पोलीस ठाण्यात आणलं आहे. यामध्ये 40 विद्यार्थीसुद्धा असू शकतात. पोलिसांना हे प्रकरण दाबून काय मिळणार आहे. बीएड केलेल्या विद्यार्थ्यांना या शाळेत शिकवण्यासाठी ठेवलं आहे," असा आरोप चेतन अहिरे नावाच्या व्यक्तीने केला आहे.