वसईमध्ये झोपेत असतानाच मुलाने केली आईची निर्घृण हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

Vasai Crime : वसईत ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेची मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 22, 2023, 11:27 AM IST
वसईमध्ये झोपेत असतानाच मुलाने केली आईची निर्घृण हत्या; समोर आलं धक्कादायक कारण title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : वसईमध्ये (Vasai Crime) मुलानेच त्याची आईची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वसईत माजिवली-देपवली ग्रामपंचायतीच्या महिला सदस्येची तिच्याच अल्पवयीन मुलाने कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी (Vasai Police) या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे गावात सध्या दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सुनीता सुनील घोगरा असं या मयत महिलेचे नाव असून त्या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली देपिवली ग्रामपंचायत मधून ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आल्या होत्या. सुनीता सुनील घोगरा या रविवारी रात्रीचे जेवण करून आपल्या खोलीत झोपल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या मुलाने सुनीता याच्या मानेवर व जबड्यावर कुऱ्हाडीने वार केले. 

काही वेळाने सुनीता यांचे पती घरी आल्यानंतर त्यांना त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. पतीने सुनीता यांना तात्काळ उपचारासाठी भिवंडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सुनिता यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला होता.

पतीनेचं सुनिता यांची हत्या केली असावी असा संशय पोलिसांना होता. मात्र चौकशी दरम्यान आपणची ही हत्या केल्याची कबुली आरोपी मुलाने पोलिसांना दिली आहे. चौकशीदरम्यान आरोपी मुलगा हा व्यसनाधीन असल्याचे समोर आले आहे. व्यसनासाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून आरोपीने तिची हत्या केल्याची माहिती मांडवी पोलिसांनी दिली आहे. मांडवी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

नालासोपार्‍यात 12 वर्षीय मुलाची आत्महत्या

नालासोपारा येथे राहणाऱ्या 12 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नालासोपारा पूर्वेच्या शिर्डीनगर येथे हा सगळा प्रकार घडला आहे. शुक्रवारी दुपारी मृत मुलाने घरातील बाथरुमध्ये असलेल्या स्टीलच्या पाईपला टॉवेल लावून गळफास घेतला. बराच वेळ मुलाने दार न उघडल्याने त्याच्या पालकांनी दार तोडले असता हा प्रकार समोर आला. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत मुलगा सहावीत शिकत होता. त्याने आत्महत्येपूर्वी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती.