Mumbai Crime: गुजरातमधील जुनागडमध्ये कथित द्वेषपूर्ण भाषण मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी पोलिसांच्या रडारवर होता. गुजरात पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असताना मुंबईतील घाटकोपरमध्ये तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुजरात पोलिसांनी मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरीला ताब्यात घेतलं. त्याला काल रात्री उशिरा जुनागडला नेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
जुनागडला नेण्यापूर्वी मुफ्ती सलमान अझहरीला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. जिथे न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला 2 दिवसाच्या ट्रान्झिस्ट रिमांडवर पाठवले. गुजरात पोलिसांनी काल दुपारी घाटकोपरच्या अमृत नगर येथून ताब्यात घेतलं होतं. पोलीस कारवाई करत असताना मुफ्तीचे समर्थक मोठ्या प्रमाणात घाटकोपर पोलीस स्टेशन समोर जमा झाले होते. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं.
त्यामुळे मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येत पोलीस याठिकाणी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वातावरण शांत करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. घाटकोपरमध्ये आता शांततापूर्ण वातावरण आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर पोलीस तैनात आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गुजरातच्या जुनागडमध्ये दिलेले कथित भडकाऊ भाषण सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 31 जानेवारीला जुनागडच्या बी डिव्हीजन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खुल्या मैदानात झालेल्या कार्यक्रमात हे भाषण झालं होतं.
भडकाऊ भाषण सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अजहरी आणि स्थानिक आयोजकांविरोधात आयपीसी कलम 153 बी आणि 505 (2) अंतर्गत प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता हा अझहरी नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न विचारला जातोय.
हा मौलाना स्वत:ला इस्लामी रिसर्च स्कॉलर म्हणवतो. तो जामिया रियाजुल जन्नाह, अल-अमान एज्युकेशन अॅण्ड वेल्फेयर ट्रस्ट आणि दारुल अमानचा संस्थापक आहे. त्याने काहिराच्या अल अजहर विद्यापीठातून शिक्षण घेतल्याची माहिती अन्य एका रिपोर्टमध्ये आहे. तो सामाजिक-धार्मिक प्रकरणांमध्ये सक्रिय असतो. त्याचा मुस्लिम चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याने अनेक तरुणांना उपदेश केलात तर कित्येकवेळा भडकाऊ भाषणदेखील दिले आहे.