आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी सचिव असल्याचं सांगत फसवणूक

मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी सचिव असल्याचं सांगत आरोपी बोगस ईमेल पाठवून फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. 

सागर कुलकर्णी | Updated: Oct 5, 2023, 02:43 PM IST
आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी सचिव असल्याचं सांगत फसवणूक title=

सागर कुलकर्णी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा खासगी सचिव असल्याचं सांगत फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उर्जा खात्यातील अधिकारी बदली संदर्भात वरिष्ठ अधिकारी यांना खोटी सही करून पत्र ईमेलवर पाठवल्याचे समोर आलं आहे. हा व्यक्ती बोगस ईमेल करुन फसवणूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

काय आहे नेमका प्रकार?
उपममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उर्ज खातं आहे. या खात्याच्या माध्यमातून फडणवीस यांच्या खासगी सचिवांचा बोगस ईमेल तयार करण्यात आला. या ईमेलवरुन उर्जा खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना बदलीचे ईमेल पाठवण्यात आले. या ईमेलमध्ये बदलीसंदर्भात नोटीस देण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे या नोटीशीवर खोट्या सह्या आणि शिक्केही मारण्यात आले होते. 

ज्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आली होती. त्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी या पत्राची उलट तपासणी केली. यात देवंद्र फडणवीस किंवा उर्जा खात्यातून हे पत्र पाठवण्यात आलं नसल्याचं उघड झालं. त्यानंतर सायबर खात्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. 

सांगलीत बसून ईमेल
सायबर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत आरोपीला अटक केली आहे आरोपीचं नावं मोहम्मद इलियास असं असून पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात तो राहाणारा आहे. मोहम्मद इलियासने खोटा ईमेले आयडी तयार करुन त्याद्वारे अधिकाऱ्यांना बदलीसंदर्भात बनावट आदेश काढत मेल पाठवला. या मेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा वापर करण्यात आला होता. 

आरोपी मोहम्मद इलियास याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने महावितरणमधील काही अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात बनावट आदेश काढले होते. गृहमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा बनावट ईमेल आयडी तयार केला होता.