मुंबईत कोसळधार! वसईत घरावर दरड कोसळली, झोपेत असतानाच बाप-लेकीचा मृत्यू

पालिकेच्या बेफिकीरीमुळे मृत्यू, हत्येचा गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

Updated: Jul 13, 2022, 04:55 PM IST
मुंबईत कोसळधार! वसईत घरावर दरड कोसळली, झोपेत असतानाच बाप-लेकीचा मृत्यू title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : वसई विरार मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका नागरी वस्तीला बसला आहे. वसई पूर्वेच्या वाघराल पाडा इथं चाळींवर दरड कोसळली असून या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील बाप-लेकीचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि मुलगा गंभीर जखमी असून त्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमित सिंग (वय 45) आणि मुलगी रोशनी सिंग ( वय 16) अशी मृतांची नावं असून पत्नी वंदना सिंग आणि मुलगा ओमकुमार सिंग अशी जखमी माय लेकाची नावं आहेत.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास सुरू असलेल्या पावसात डोंगराच्या कडेलाच बांधलेल्या चाळींवर दरड कोसळली. डोंगरावरील मोठं, मोठे दगड चाळींवर कोसळल्याने या दुर्घटनेत अनेक घरांचे नुकसान झालं, मात्र त्याचा सर्वात मोठा फटका सिंग कुटुंबियांना बसला

हे कुटुंब सकाळी झोपेत असतानाच डोंगराचा काही भाग त्यांच्या घरावर पडला आणि त्यात सारं कुटुंबच अडकलं, आणि होत्याचं नव्हतं झालं. बसलेले हादरे आणि मोठ्या आवाजाने चाळीतील आजूबाजूच्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. प्रशासनाला याबाबतची माहिती दिली.

वसई विरार पालिकेचे अग्निशमन पथक आणि एनडीआरएफ जवानांच्या मदतीने दरडीचा भाग बाजूला काढून चारही जणांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं. वसई पालिकेचे आयुक्त, अधिकारी त्यांचासोबत मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते यांनी घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

वसईच्या याच परिसरात आजपासून सहा ते सात वर्षाआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महसूल व वनविभागाच्या जागेवर उभ्या राहत असलेल्या अनधिकृत चाळींचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते..मात्र आता हीच अनधिकृत चाळींची बांधकाने नागरिकांच्या जीवावर उठलेली पाहायला मिळत आहेत.

हे आकस्मित मृत्यू नव्हे तर हत्या
वाघराल पाडा परिसरात झालेली अनधिकृत बांधकामे ही पालिकेच्या आशीर्वादाने झाली आहेत. त्यामुळे आज पालिकेच्या बेफिकरीमुळे गेलेल्या दोन निष्पाप जीवांची मृत्यू नोंद न करता त्यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे मनोज बारोट यांनी केली आहे. पालिका आयुक्तांसाह त्यास जवाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करावा अशी प्रतिक्रिया त्यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे..

पवईत संरक्षक भिंत कोसळली
आज सकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना समोर येत आहेत. पवईमध्ये इंदिरा नगर आणि हरी ओम नगर या ठिकाणी संरक्षक भिंत आणि घराच्या भिंती कोसळून तीन ते चार घरांचे नुकसान झालं. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र धोकादायक असलेल्या आजू बाजूच्या घरांना पालिकेने रिकामे केले असून सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.