मुंबई : जेएनयू हल्ल्याविरोधात मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर तरुणांनी केलेल्या आंदोलनाची हायकोर्टानं दखल घेतली आहे. दिल्लीत जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलनं झाली.. हल्ल्यानंतर लगेच मुंबईतील तरुणाईनंही या हल्ल्याचा निषेध करत मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे धरणं आंदोलन सुरु केलं. मात्र हे आंदोलन अतिशय शांततेत पार पाडण्यात आलं. या आंदोलनादरम्यान ध्वनी प्रदुषणाची एकही तक्रार आली नाही. त्यामुळे या आंदोलनाची दखल थेट हायकोर्टानं घेतली.
Mumbai: Protesters(protesting against #JNUViolence) at Gateway of India evicted by Police and relocated to Azad Maidan. (earlier visuals) pic.twitter.com/llYz0OAfYD
— ANI (@ANI) January 7, 2020
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अर्थात जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतल्या गेट-ऑफ इंडियाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांना ३६ तासांची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलन करण्याचं आवाहन पोलिसांनी केले. गेट वे ऑफ इंडियाजवळील आंदोलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होतोय. तसंच पर्यटकांनाही अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मात्र त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
शांततेत आंदोलनं कशी करायची हे आजची तरुणाई प्रत्येकाला शिकवत आहे त्यामुळे त्यांच्या आवाजाची ताकद वाढली आहे असं हायकोर्टानं म्हटलंय. शिवाजी पार्कसंदर्भात विकॉम ट्रस्टनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपिठानं या आंदोलनाचं कौतुक केलंय.
दुसरीकडे जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी रात्री उशिरा घडवून आणलेल्या हिंसाचारात २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. रविवारी काही कपड्यानं चेहरा झाकलल्या लोकांनी जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण आणि तोडफोड केली होती. त्यांच्या हातात काठ्या आणि लोखंडाच्या सळ्याही होत्या. साबरमती विद्यार्थी हॉस्टेल या हल्ल्याच्या टार्गेटवर होतं. हिंदु रक्षा दलाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.