कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) मुंबई महानगरपालिकेला (Mumbai Municipal Corporation) मोठा दणका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे दादर (Dadar) स्टेशनजवळचा (Dadar Station) दीडशे कोटींचा भूखंड (Plot) पालिकेने गमावला आहे. दादर पूर्व येथील दादासाहेब फाळके रोडवरच्या 2 हजार चौरस मीटरच्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्याचे आदेश मुंबई हाय कोर्टाने राज्य सरकारला (State Government) दिले आहेत.
दादर पूर्व स्टेशनजवळच्या कैलास लस्सी समोरच्या खेळाच्या मैदानावरील आरक्षण (Reservation) हायकोर्टाने उठवलं आहे. 10 वर्षांपूर्वी पर्चेस ऑर्डर देवूनही संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुंबई महापालिकेने पूर्ण केली नसल्याने हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. संबंधित भूखंडावर खेळाच्या मैदानाचं आरक्षण पडलं होतं, त्याबदल्यात जमीन मालकाला 9 कोटी 20 लाख पालिकेला द्यायचे होते. पण पालिका अधिकाऱ्यांनी जाणुनबुजून वेळकाढू धोरण राबवून जमीन मालकाला फायदा पोहचविण्यासाठी घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला होता.
याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.