मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यपकाने चक्क विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
३५ वर्षीय प्राध्यापकावर आरोप आहे की, त्याने विद्यार्थीनीला परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या बदल्यात चुंबनाची मागणी केली होती. यानंतर पीडित विद्यार्थीनीने प्राध्यापकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
विद्यार्थीनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून अटकही करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित १७ वर्षीय विद्यार्थीनी ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉमर्सचं शिक्षण घेते. या विद्यार्थीनीला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले होते. त्यानंतर ८ मार्च रोजी आरोपी प्राध्यापकाने मार्क्स वाढवून देण्याच्या बदल्यात चुंबनाची मागणी केली.
पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी सांगितले की, प्राध्यापकाने केलेल्या या कृत्याचा पीडित विद्यार्थीनीवर खूपच वाईट परिणाम झाला आहे. विद्यार्थीनीने आम्हाला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी प्राध्यापकाला अटक केलीय.
या प्रकरणी ज्युनिअर कॉलेज प्रशासनाने सांगितले की, आरोपी प्राध्यापक हा गेल्या १३ वर्षांपासून शिकवतो. हे प्रकरणा आता पोलिसांत आहे त्यामुळे यावर आता कुठलीही प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही.