मुंबई : वांद्रे वरळी सी-लिंकवरील प्रवास आता महागणार आहे.
मुंबईकरांना टोलसाठी आता जादाचे पैसे मोजावे लागणार आहे. 1 एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. कारधारकांना एक एप्रिलपासून एका बाजुनं 60 ऐवजी 70 रूपये मोजावे लागणार आहेत. तर दोन्ही बाजुच्या प्रवासासाठी 90 ऐवजी आता 105 रूपये मोजावे लागणार आहेत. मासिक पासच्या दरांतही मोठी वाढ करण्यात आली आहे.
मासिक पासचे दरही 3 हजारांवरून साडे तीन हजार रूपये करण्यात आलाय. त्यामुळं आता मुंबईकरांना वांद्रे वरळीचा प्रवालस महाग ठरणार आहे. सुरूवातीपासूनच वांद्रे-वरळी सी-लिंकवरून अपेक्षित उत्पन्न मिळालेलं नाही. त्यामुळं हे दर वाढवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
१९९९ साली शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या लिंकच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस हे काम अवघ्या ५ वर्षात होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र स्थानिकांनी या प्रोजेक्ट केलेल्या विरोधामुळे हे काम रखडले होते. पर्यावरणवादी, मच्छिमार, स्थानिक यांनी कठोर विरोध दर्शवल्यामुळे सीलिंक पूर्ण होईल की नाही यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या लिंकला मान्यता दिल्यानंतर १० वर्षांनी या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं.
वांद्र्यातून वरळीत येण्यासाठी जवळपास ६० ते ९० मिनिटे लागतात. मात्र या लिंकमुळे अवघ्या २० ते ३० मिनिटात हा प्रवास आता करता येतो.