Afreen Shah Death in Kurla Bus Accident: मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबासाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरलाय. कारण या अपघातामुळे ही सात कुटुंब उद्धवस्त झालीयत. त्यातीलच एक कुटुंब म्हणजे या अपघातात मृत्यू झालेल्या 19 वर्षांच्या आफ्रिन शाहचं कुटुंब. तर 55 वर्षीय नर्स कनिस अन्सारी रात्रीच्या शिफ्टसाठी हॉस्पिटलमध्ये जात असताना अपघाताची बळी ठरली. (mumbai kurla best bus accident afreen shah and kanis ansari death)
कुर्ल्याच्या सलीम अब्दुल शाह यांनी कुर्ला बेस्ट बसच्या अपघातात आपली 19 वर्षांची लेक गमावलीय. आफ्रिन शाह ही 19 वर्षांची मुलगी नोकरीचा पहिला दिवस संपवून घरी परतत होती. स्टेशन परिसरात ती घरी येण्यासाठी रिक्षा शोधत होती. मात्र त्याचवेळी तिच्यावर तिच्यावर काळाने घाला घातला. अपघातग्रस्त बसने चिरडल्याने आफ्रिनचा दुर्दैवी मृत्यू झाला. रिक्षा मिळत नाही हे सांगण्यासाठी सोमवारी रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी आफ्रिनने वडिलांना केलेला फोन कॉल हा शेवटचा ठरला.
लेकीच्या नोकरीचा पहिला दिवस असल्यानं सकाळी घरी मोठा आनंद होता मात्र रात्री दुखाचा डोंगर कोसळल्याची भावना सलीम शाह यांनी व्यक्त केलेत. अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून 5 लाख तर बेस्टकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. पण पैसे देऊन माझी लेक परत येणार नाही. त्यापेक्षा यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आफ्रिनच्या वडिलांनी केलीय.
कुर्ला स्थानकाला जोडणारा सर्वात वर्दळीचा मार्ग म्हणजे काँग्रेसच्या प्रमुख नेत्याच्या नावावर असलेला एसजी बर्वे रोड. जास्तीत जास्त शहराच्या विविध भागात त्यांच्या कामाच्या ठिकाणी ट्रेन किंवा बस पकडण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या मार्गाचा वापर करतात. अपघाताची वेळ अशी होती की अनेक लोक दिवसभर दमछाक करून घरी परतत होते, ज्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढली.
कुर्ल्याच्या बेस्ट अपघातात सलीम शाह यांनी आपली लेक गमावलीय. यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. आरोपी चालकावर कारवाई होईल. मात्र अशा घटनांमधून प्रशासन काही शिकणार आहोत की नाही. अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.