'राज्य सरकारच्या पत्रात लोकल सुरु करण्याचा मुद्दा नव्हता'

राज्य सरकारने मिटींग घ्यावी अशी मागणी

Updated: Nov 6, 2020, 01:04 PM IST
'राज्य सरकारच्या पत्रात लोकल सुरु करण्याचा मुद्दा नव्हता' title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : महिलांसाठी लोकल सुरु केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी देखील सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याचे सांगण्यात येत होते. पण अशी मागणी झाली नसल्याचा दावा मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी केला असून चेंडु पुन्हा राज्य सरकारच्या कोर्टात गेलाय. २८ तारखेला राज्य सरकारने रेल्वेला जे पत्र पाठवले त्यात फक्त लोकल सुरू करण्यासंदर्भात माहिती मागवली होती. पण लोकल सुरु करा असा कुठेही उल्लेख नव्हता असे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

राज्य सरकारच्या मागणीनुसार आम्ही जी माहिती द्यायची होती ती सर्व दिली आहे. आम्हाला सर्व सामान्यांसाठी लोकल सुरु करण्यात अडचण नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. आहे. आम्हाला राज्य सरकार सोबत बैठक हवी आहे ती मात्र बैठक राज्य सरकार कडून घेतली जात नसल्याचेही ते म्हणाले.

आम्ही आमच्या जवळपास सर्व सर्व्हिस सुरू केल्या आहेत. कोरोना काळात आम्ही राज्य सरकारच्या सुचने नुसार या पूर्वी विविध गटातील प्रवाश्यांना प्रवासाची परवानगी दिली आहे.आम्ही राज्य सरकारच्या प्रतिसादाची आणि स्पष्ट निर्देशाची वाट पाहत आहोत असे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.