मुंबई : महाराष्ट्रात अजून मान्सून दाखल झालेला नसला तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी जोरदार हजेरी लावली. पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्यानं कामावर जाताना मुंबई आणि परिसरातल्या नागरिकांची कामाला जाताना तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणार पाणी साचण्याच्या घटना घडल्या. हिंदमातालाही थोडं पाणी साचलं. मात्र पावसाला उसंत मिळाल्यामुळे पाण्याचा निचरा झाला. त्यामुळं वाहनधारकांना दिलासा मिळाला. उपनगरांमध्ये रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती.
या पहिल्याच पावसाच्या पाण्यामुळे भरलेल्या ड्रेनेजमध्ये पडून ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. गोवंडीच्या चिता कँप इथे एम जे रोडवर दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घ़टना घडली. आदियान परवेझ तांबोळी असं या मुलाचं नाव आहे. दरम्यान, उद्या आणि परवा मुंबईत मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.. तर पावसाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचा दावा महापौरांनी केलाय.