दीपक भातुसे, झी मीडिया,मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर स्थानकावर असभ्य वर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात त्यांनी दादर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. टॅक्सी ड्रायव्हर आणि एजंट कुलजित सिंह मल्होत्रा याने सुप्रिया सुळे यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले.
सुप्रिया सुळे या आज सकाळी औरंगाबाद आणि मराठवाडा दौरा करुन देवगिरी एक्सप्रेसने दादरला पोहोचल्या. देवगिरी एक्सप्रेस ही दादरला ३ मिनीटे थांबते म्हणून त्यांच्याकडे उतरण्यासाठी खूप कमी वेळ होता. तितक्यात टॅक्सी एजंट कुलजित सिंह मल्होत्रा हा त्यांना डब्याजवळ येऊन टॅक्सी टॅक्सी असे विचारू लागला. सुप्रिया सुळेंनी त्याला टॅक्सी नको असल्याचे सांगितले. तसेच समोर असलेल्या कुलीला बॅग घेण्यासाठी विनंती केली. तरीही कुलजित सिंह हा जवळ येत टॅक्सी टॅक्सी असे ओरडत होता. त्याला नको असे सांगितल्यावरही तो कानाजवळ येऊन ओरडत होता असे सुप्रिया सुळे यांनी झी २४ तास ला सांगितले.
रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने महिलांना असा त्रास होतो. त्यामुळे मी लिखित स्वरूपात ही तक्रार केल्याचे सुप्रिया सुळे म्हणाले. प्रशासनाने यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी या प्रकाराचे गांभीर्य बाळगायला हवे हे यातून स्पष्ट होत आहे.