Mumbai News: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरामध्ये मागच्या काही दिवसांपासून उकाडा वाढताना दिसत आहे. पण, हा उकाडा हैराण करण्याआधीच मुंबईकरांची चिंता वाढवली आहे ती म्हणजे एका निर्णयानं. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईत वीजेचे दर महागणार असून, नागरिकांना येणाऱ्या वीजबिलाच्या वाढीव रकमेच्या रुपात ते दिसणार आहेत. वीजबिल वाढीसाठीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळं आता नागरिकांना हा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार शहरात सध्याच्या घडीला वीजेचे दर 24 टक्क्यांनी महागणार आहेत. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनच्या वतीनं टाटा पॉवरच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळं आता वीजेच्या दरात वाढ होणार आहे. 2024-25 या वर्षासाठी ही वाढ लागू असून, 1 एप्रिल 2024 पासून नव्या दरांनुसार वीजेची बिलं लागू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं येत्या काळात नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की.
वीजदरवाढीचा हा निर्णय सर्वसामान्यांवर सर्वात जास्त प्रमाणात होताना दिसणार आहे. ज्या ग्राहकांकडून 100 युनिटहून कमी वीजेचा वापर केला जातो त्यांच्यावर या दरवाढीचा अधिक परिणाम होताना दिसणार आहे. कारण, इथून पुढं त्यांना 1.65 रुपये प्रति युनिट (kWh) ऐवजी थेट 4.96 रुपये प्रति युनिट इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या दरवाढीदरम्यानही 500 युनिट किंवा त्याहून अधिक वीजेचा वापर करणाऱ्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. कारण, या ग्राहकांसाठी वीजेचे दर प्रति युनिट 8.35 रुपयांवरून 7.94 रुपयांवर आले आहेत.
सध्याच्या घडीला टाटा समुदारडून 927 कोटी रुपयांची एरियर रक्कम भरून काढण्यासाठी म्हणून हे दरवाढीचं पाऊल उचलण्यात आलं आहे. प्रत्यक्षात टाटा समुहानं 12 टक्के वीज दरवाढीची मागणी केली होती. पण, नियामक मंडळानं थेट 24 टक्के वाढीलाच मान्यता दिली ज्यामुळं आता वीजबिलाची गणितं बऱ्याच अंशी बदलताना दिसणार आहेत.