दादरचा फुटपाथ पालिकेने नव्हे चोरांनीच खोदला, दिवसाढवळ्या 7 लाखांची चोरी, पण हे घडलं कसं?

Mumbai News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली आहे. स्थानिकांमुळं ही घटना उघडकीस आली आहे

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 13, 2024, 03:59 PM IST
दादरचा फुटपाथ पालिकेने नव्हे चोरांनीच खोदला, दिवसाढवळ्या 7 लाखांची चोरी, पण हे घडलं कसं? title=
mumbai news today The footpath along was dug up to carry out the theft of copper wire in dadar

Mumbai News: पाऊस सुरू होण्यापूर्वी मान्सून पूर्व कामांना वेग होतो. अशावेळी नालेसफाई, झाडांची छाटणी किंवा गटाराची साफसफाई अशी कामे पालिकेकडून हाती घेतली जातात. मुंबईकरांना अशा कामांचा अुनभव आहे. मुंबईतील दादर परिसरातही फुटपाथचे खोदकाम करण्यात येत होते. नागरिकांना वाटले नेहमीप्रमाणे पालिकेकडूनच हे काम करण्यात येत आहे. मात्र, काही दिवसांनी भलतंच सत्य समोर आलं आहे. 

दादर परिसरातील एका फुटपाथचं खोदकाम करण्यात येत होते. पाच जण हे खोदकाम करत होते. सुरुवातीला नागरिकांना हे पालिकेचे कर्मचारी आहेत असे वाटले. मात्र ते कर्मचारी नसून चोर होते. या चोरांनी फुटपाथ खोदून त्यातील 6-7 लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरल्या. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. दादर-माटुंगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील ही घटना आहे. इथ राहणाऱ्या स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना सूचना दिली. 

दिवसाढवळ्या फुटपाथ खोदुन त्यातून तांब्याच्या केबल चोरीला गेल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. तांब्याच्या केबलची किंमत 845 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चोरांनी तब्बल 6-7 लाख रुपयांच्या किंमतीची केबल चोरली आहे. या प्रकारच्या घटना माटुंगा, किंग्ज सर्कल, वडाळा आणि शिवाजी पार्क येथे घटना घडू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. 

किंग्स सर्कल-दादर टीटी सर्कल दरम्यानचा 2-3 मीटर रुंदीचा फुटपाथ मधे मधे खोदल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यामुळं सुरुवातीला हे पालिकेने केलं असावं असा संशय आला. मात्र, बीएमसीने 15 दिवसांपूर्वीच हा फुटपाथ खोदला होता. तो सुरळीत केल्यानंतर त्याच जागी पुन्हा खोदकाम का करण्यात आलं, असां प्रश्न पडल्यानंतर रहिवाशांनी पुन्हा मनपा गाठलं आणि सर्व प्रकार अधिकाऱ्याच्या कानावर घातला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर फुटपाथच्या खाली असलेल्या केबलमधून ताब्यांच्या तारा लंपास केल्या असल्याचे लक्षात आलं. 

दरम्यान, या केबलच्या तारा MTNL कंपनीच्या होत्या. दादर-माटुंगा परिसरात 400 हून अधिक टेलिफोन लाइन्स ट्रिप झाल्या होत्या. तशी तक्रार माटुंगा पोलिसांकडे आली होती. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा एमटीएनलची लाखो रुपये किमतीची 105 मीटर लांब तांब्याची तार चोरीला गेली असल्याचे आढळले. दादर टीटी सर्कलच्या परिसरातच ही घटना घडली आहे.