Mumbai Local Mega Block : आज 2023 या वर्षातील शेवटचा रविवार. अशातच नवीन वर्षासाठी मुंबई सज्ज झाली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन लाइन्स, गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा किंवा थर्टी फर्स्ट या पर्यटन स्थळावर लोकांनी गर्दी केली आहे. जर तुम्ही पण थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक नक्की तपासा. कारण आज मध्य रेल्वेकडून 2023 या वर्षातील शेवटचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. परिणामी ब्लॉकमुळे काही लोकल गाड्या रद्द असतील तर तर काही लोकल गाड्या उशिराने धावतील.
कुठे - माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
वेळ- सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत
परिणाम- जलद मार्गांवरील लोकल फेर्या ब्लॉक काळात धिम्या मार्गांवर वळवल्या जातील. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहतील तर काही लोकल गाड्यांना उशीर होणार आहे.
कुठे - पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
वेळ- सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत
परिणाम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, ठाणे ते वाशी/नेरूळ आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन लोकल ब्लॉक काळात रद्द राहतील. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील. बेलापूर/नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल फेऱ्या रद्द राहतील.
मुंबईकरांमध्ये थर्टी फर्स्टचा फीवर चढत असून मुंबईकर आणि पर्यटकांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेने धाव घेतली आहे. 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1.30 ते सोमवारी पहाटे 4 वाजेपर्यंत चार विशेष लोकल धावणार आहेत. दरम्यान, सर्व विशेष उपनगरीय गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुख्य मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रविवारी मध्यरात्री दीड वाजता सुटणारी विशेष लोकल सोमवारी पहाटे तीन वाजता कल्याणला पोहोचेल. तर कल्याणमधून रात्री दीड वाजता सुटणारी लोकल सीएसएमटी स्थानकात सोमवारी पहाटे 3 वाजता पोहोचेल.
हार्बर मार्ग
सोमवारी रात्री 1.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुटेल आणि 2.50 वाजता पनवेल येथे पोहोचले. तर पनवेल स्थानकातून रविवारी रात्री 1.30 वाजता लोकल सुटेल आणि सीएसएमटी स्थानकात 2.50 वाजता पोहोचेल.