लेटमार्कमुळे पगार कापला, मुंबईकराची रेल्वेला नोटीस

मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल नोकरदारांच्या करिअरची डेथलाईन ठरु पाहत आहे.

Updated: Jun 22, 2019, 10:08 PM IST
लेटमार्कमुळे पगार कापला, मुंबईकराची रेल्वेला नोटीस title=

नित्यानंद शर्मा, झी मीडिया, मुंबई : मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल नोकरदारांच्या करिअरची डेथलाईन ठरु पाहत आहे. मध्य रेल्वेच्या लोकलच्या रोजच्याच लेटलतिफीमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. वैतागलेल्या मुंबईकरांनी आता रेल्वेलाच कायदेशीर नोटीस बजावली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या उपनगरिय सेवेचं वेळापत्रक विस्कळीत झालेलं आहे. मुंबईकरांना एकही दिवस वेळेवर ऑफिसमध्ये पोहचता आलेलं नाही. लोकलच्या या लेटलतिफीमुळे मुंबईकरांना खूपच मनस्ताप सहन करावा लागतोय. टिटवाळ्यात राहणाऱ्या शेखर कापुरे यांचा तर त्यांच्या कंपनीनं पगारच कापला. रेल्वेच्या चुकीमुळे कार्यालयात बोलणी खावी लागत असल्याने कापुरेंनी रेल्वेलाच कायदेशीर नोटीस बजावली आहे.

शेखर कापुरेंचा फक्त पगार कापला गेला आहे. अनेक मुंबईकरांच्या लोकलच्या लेट मार्कमुळे नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. खासदार मनोज कोटक यांनी लोकलच्या लेटमार्कचा प्रश्न थेट संसदेत उपस्थित केला. मुंबईची लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. पण रेल्वेच्या लेट मार्कमुळे अनेकांच्या करीअरची ती डेथलाईन बनू पाहत आहे.